श्रीकांत, सिंधू, सायना उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

                 आशियाई बॅडमिंटन स्पर्धा

वुहान – अग्रमानांकित किदंबी श्रीकांत आणि बिगरमानांकित एच. एस. प्रणय यांनी पुरुष एकेरीत, तर जागतिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रकुल विजेती सायना नेहवाल यांनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर परस्परविरुद्ध शैलीत मात करताना येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.मात्र बी. साई प्रणीथचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. तसेच पुरुष व महिला दुहेरीत भारतीय जोड्यांना दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांची आगेकूच खंडित झाली.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या वोंग विंग की व्हिन्सेंटने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे किदंबी श्रीकांतला पूर्ण सामना न खेळताच उपान्त्यपूर्व फेरी गाठता आली. व्हिन्सेंटने सामना सोडून दिला तेव्हा श्रीकांत पहिल्या गेममध्ये 7-2 असा आघाडीवर होता.त्याआधी पहिल्या फेरीत जपानच्या बिगरमानांकित केन्टा निशिमोटोवर संघर्षपूर्ण विजय मिळविणाऱ्या श्रीकांतसमोर उपान्त्यपूर्व फेरीत मात्र मलेशियाच्या पाचव्या मानांकित ली चोंग वेईचे कडवे आव्हान आहे. ली चोंग वेईनेच श्रीकांतला पराभूत करून गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

ली चोंग वेईने दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंगचा प्रतिकार 16-21, 21-9, 21-11 असा संपुष्टात आणताना आगेकूच केली. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या लढतीत तैपेई चीनच्या वांग त्झू वेईची कडवी झुंज मोडून काढण्यासाठी भारताच्या प्रणयला 16-21, 21-14, 21-12 अशी तब्बल 56 मिनिटे लढत द्यावी लागली. पहिल्या फेरीत थायलंडच्या वांगचेरॉन कान्टाफोनवर संघर्षपूर्ण विजय मिळविणाऱ्या प्रणयला उपान्त्यपूर्व फेरीत कोरियाच्या द्वितीय मानांकित सोन वान हो याच्याशी झुंज द्यावी लागेल.सोन वान हो याने दुसऱ्या फेरीत जपानच्या कान्टा सुनेयामाचा 21-12, 21-18 असा एकतर्फी फडशा पाडला.

भारताच्या बी. साई प्रणीथला चीनच्या तृतीय मानांकित चोन लोंगविरुद्ध 12-21, 12-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. ही लढत 39 मिनिटे रंगली. साई प्रणीथने त्याआधी साई प्रणीथला थायलंडच्या सुप्पान्यू अविहिंगसेनॉनचा कडव्या झुंजीनंतर पराभव करीत विजयी सलामी दिली होती. परंतु अत्यंत अनुभवी खेळाडू असलेल्या चेन लोंगविरुद्ध त्याला फारसा प्रतिकारही करता आला नाही. चेन लोंगला आता हॉंगकॉंगच्या आठव्या मानांकित का लोंग अँगसशी लढत द्यावी लागेल. अँगसने दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर तीन गेमच्या लढतीनंतर मात करताना उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.

सायना, सिंधू यांचे एकतर्फी विजय

सायना नेहवालने राष्ट्रकुल स्पर्धेतील विजयमालिका कायम राखताना महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या गाओ फॅंगजी हिच्यावर 21-18, 21-8 अशी 40 मिनिटांच्या लढतीनंतर मात केली. पहिल्या फेरीत सिंगापूरच्या येओ जा मिनचा 33 मिनिटांत धुव्वा उडविणाऱ्या सायनासमोर उपान्त्यपूर्व फेरीत कोरियाच्या ली जॅंग मी हिचे कडवे आव्हान राहील. ली जॅंगने दुसऱ्या फेरीत थायलंडच्या चतुर्थ मानांकित रत्चानोक इन्तेनॉनवर 19-21, 21-17, 21-15 असा विजय मिळविताना खळबळजनक निकालाची नोंद केली.

तृतीय मानांकित सिंधूने दुसऱ्या फेरीत चीनच्या चेन शियाओजिनचे आव्हान 21-12, 21-15 असे 44 मिनिटांत मोडून काढत आगेकूच केली. पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या पेई यु पो हिचा धुव्वा उडविणाऱ्या सिंधूसमोर उपान्त्यपूर्व फेरीत कोरियाच्या सातव्या मानांकित संग जि हयुनचे आव्हान आहे. संगने दुसऱ्या फेरीच्या लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगफानचा प्रतिकार 21-14, 21-12 असा मोडून काढत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

 दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

महिला व पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. महिला दुहेरीत मेघना जक्‍कमपुडी व पूर्विशा राम या भारतीय जोडीला दुसऱ्या फेरीत पी. देचापोल व टी. सॅपसिरी या थायलंडच्या सातव्या मानांकित जोडीविरुद्ध केवळ 23 मिनिटांत 8-21, 9-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तसेच पुरुष दुहेरीत ली जुनहुई आणि लियू युचेन या चीनच्या अग्रमानांकित जोडीने एम. आर. अर्जुन व रामचंद्रन श्‍लोक या भारतीय जोडीचा 21-11, 21-19 असा 29 मिनिटांत पराभव केला.

मात्र अननुभवी भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये अग्रमानांकित जोडीला कडवी झुंज देत सर्वांची मने जिंकली. त्याआधी मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारीख, वेंकट गौरव व जुही देवगण आणि रोहन कपूर व कुहू गर्ग या भारतीय जोड्यांना एकतर्फी पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)