शौचालयाच्या विषयाला मध्यान्ह भोजनाची उपसूचना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तधारी भाजपकडून सभाशास्त्राचे पालन होत असल्याचा दावा करत, अनेक विषयांना उपसूचना देण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, सोमवारी झालेल्या महासभेत चक्क शौचालय बांधणीच्या विषयाला विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याची उपसूचना देत, सभाशास्त्राप्रमाणे कसा चालविला जातो, याचा प्रत्यय आणून दिला. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

महापालिकेची तहकूब सभा सोमवारी (दि. 4) पार पडली. राष्ट्रवादीने घातलेला गदारोळ आणि भाजपने मंजूर केलेले 13 विषय यामुळे ही सभा चांगलीच गाजली. या गदारोळाचा फायदा घेत भाजपने विषय पत्रिकेतील अनेक विषयांना उपसूचना दिल्या. महासभेच्या विषय पत्रिकेत केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाष्ट्र अभियान राबविण्यात येत असून, महापालिकेच्या कामगिरीच्या अंमलबजावणीचा आढावा अवलोकनाचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. संतपीठाच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आसनासमोर गदारोळ करायला सुरुवात करताच, कोणताही विषय वाचन न करता, सूचक अनुमोदनाचे नियम डावलून एकूण 13 विषय मंजूर केल्याची घोषणा करत, आसन सोडले. त्यानंतर नगरसचिव उल्हास जगताप यांनी ही सभा एका तासाकरिता तहकूब केली जात असल्याचे जाहीर केले. भाजपकडून सभाशास्त्राची केल्या जाणाऱ्या तोडफोडीनंतर तहकूब केलेल्या सभेमुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहाबाहेर निघून गेले. तासाभरानंतर सुरु झालेल्या सभेतही पुन्हा गदारोळ झाला.

राहुल जाधव तर पळपुटे महापौर
याबाबत विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, सत्ताधारी भाजपकडून त्याची पायमल्ली केली जात आहे. कोणतीही चर्चा न करता विषय मंजूर करत असल्याचे जाहीर करुन सभागृह सोडणारे राहुल जाधव हे तर पळपुटे महापौर असल्याचा आरोप साने यांनी केला. तसेच हे सर्व विषय सभाशास्त्राची तोडफोड करून मंजूर केले असल्याने, ते सर्व विषय रद्द करण्याची मागणी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

ै”ती’ क्‍लिप स्वतःकडे का ठेवली?
संतपीठाच्या कामात रिंग झाल्याचा पुरावा म्हणून एका ठेकेदारासोबत झालेल्या संभाषणाची “ऑडिओ क्‍लिप’ सभागृहात ऐकविणार असल्याचे साने यांनी जाहीर केले होते. मात्र, सभेतील गदारोळ आणि दोनदा झालेल्या सभा तहकुबीमुळे ही “ऑडिओ क्‍लिप’ साने यांना सभागृहात ऐकविता आली नाही. त्यानंतर त्यांनी ही “ऑडिओ क्‍लिप’ सोशल मीडियावर “व्हायरल’ केली. तर साने यांच्याकडे ही क्‍लिप होती, तर त्यांनी दोन महिने स्वत:कडे का ठेवली? असा सवाल सभागृह नेते एकनाथ पवार यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.