शेलार ग्रुप, डिव्हाईन स्टार्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पहिली एक्‍सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – शेलार ग्रुप, डिव्हाईन स्टार्स या संघांनी अनुक्रमे रिग्रीन व मेटा स्कूल या संघांचा पराभव करताना पहिल्या एक्‍सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्‍सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंट्‌स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

डेक्‍कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपान्त्य फेरीच्या पहिल्या सामन्यात सोनिया डबीर हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने रिग्रीन संघाचा 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. सामन्यात शेलार ग्रुपच्या अचूक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे रिग्रीन संघाचा डाव गडगडला. त्यांच्या फलंदाज झटपट बाद होत गेल्याने रिग्रीन  संघाचा डाव निर्धारित 20 षटकांत 8 बाद 66 धावांवर रोखला गेला. भक्‍ती शास्त्रीच्या 17 धावा व तेजल हसबनीसच्या 12 धावा वगळता रिर्गीनची एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकली नाही.

शेलार ग्रुपकडून वैष्णवी काळेने 4 धावांत 4 गडी बाद केले. वैष्णवीला सोनिया डबीर (1-14), श्वेता खटाळ (1-14) व कृतिका पोफल्ली (1-19) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. शेलार ग्रुप संघाने 10.5 षटकांत 1 बाद 67 धावा फटकावताना एकतर्फी विजयाची नोंद केली. सोनिया डबीरने 41 चेंडूंत नाबाद 45धावा, तसेच कृतिका पोफल्लीने 20 चेंडूंत नाबाद 11 धावा करून विजयात मोलाचा वाटा उचलला. मिळवून दिला. सोनिया डबीर सामन्याची मानकरी ठरली.

उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत भारती फुलमाळीच्या उपयुक्‍त 39 धावांच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने मेटा स्कूल संघाचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना मेटा स्कूल संघाचा डाव 18.4 षटकांत 71 धावांत गुंडाळला गेला. उत्कर्षा पवारने 19 धावा, तर पूनम खेमनारने 15 धावा केल्या. डिव्हाईन स्टार्सकडून निकिता भोर (3-7), प्रिया सिंग (2-14), साक्षी वाघमोडे (1-10), गौतमी नाईक (1-10) व आदिती गायकवाड (1-16) यांनी प्रभावी गोलंदाजी करत मेटा स्कूल संघाला 71 धावांवर रोखले.

विजयासाठी 72 धावांचे आव्हान डिव्हाईन स्टार्स संघाने 14.2 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 74 धावा काढून सहज पूर्ण केले. यात भारती फुलमाळीने 39 चेंडूंत 4 चौकारांसह 39 धावांची संयमी खेळी केली. कृत्तिका टेकाडेने 16 धावा, तर वैष्णवी रावलियाने 10 धावा करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. भारती फुलमाळी सामन्याची मानकरी ठरली.

  सविस्तर निकाल –

उपान्त्य फेरी – रिग्रीन- 20 षटकांत 8 बाद 66 धावा (भक्ती शास्त्री 17 (27), तेजल हसबनीस 12 (17), वैष्णवी काळे 4-4, सोनिया डबीर 1-14, श्वेता खटाळ 1-14, कृतिका पोफल्ली 1-19) पराभूत वि. शेलार ग्रुप- 10.5 षटकांत 1 बाद 67 धावा (सोनिया डबीर नाबाद 45 (41), कृत्तिका पोफल्ली नाबाद 11 (20), श्रद्धा पाखरकर 1-15); सामनावीर- सोनिया डबीर;

मेटा स्कूल- 18.4 षटकांत सर्वबाद 71 धावा (उत्कर्षा पवार 19 (28), पूनम खेमनार 15 (31), निकिता भोर 3-7, प्रिया सिंग 2-14, साक्षी वाघमोडे 1-10, गौतमी नाईक 1-10, आदिती गायकवाड 1-16) पराभूत वि. डिव्हाईन स्टार्स- 14.2 षटकांत 3 बाद 74 धावा (भारती फुलमाळी 39 (39), कृत्तिका टेकाडे 16 (20), वैष्णवी रावलिया 10 (21), कल्याणी चावरकर 1-7, श्रुती महाबळेश्वर 1-9, सोनाली शिंदे 1-15); सामनावीर- भारती फुलमाळी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)