शेती होणार आधुनिक…

आधुनिक कृषि अवजारे खरेदीसाठी मिळणार अनुदान


कृषी यांत्रिकीकरण योजनेस मंजुरी

मुंबई – पारंपारिक पद्धतीने केल्या जाणा-या शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून (2018-19) राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांना सहाय्यभूत ठरणारी कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार कृषि अवजारे-यंत्रांच्या खरेदीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासह कृषि अवजारे बॅंकांनाही अनुदान देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरसाठी 35 टक्के, तर इतर बाबींसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येईल. तसेच इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरसाठी 25 टक्के, तर इतर बाबींसाठी 40 टक्के अनुदान मिळेल. कृषी अवजारे बॅंक स्थापन करण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी यावर्षी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासह पुढील प्रत्येक वर्षासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येणार आहे.

शेतीची मशागत, पेरणी, पिकांतर्गत मशागतीची कामे, कापणी आणि कापणीपश्‍चात प्रकिया या प्रक्रियांसाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. मात्र, राज्यातील 80 टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक असल्यामुळे यांत्रिकीकरणासाठी लागणाऱ्या यंत्र-अवजारांच्या खरेदीसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने आजची योजना शेतकऱ्यांसाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)