शेतकऱ्यांसाठी कृषी प्रर्दशनातून आधुनिक माहितीचे दालन

सभापती जगदाळे : इंदापुरात भरणार शेतकऱ्यांचा महोत्सव, दिग्गजांची उपस्थिती

रेडा- इंदापूर बाजार समितीमध्ये 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2019 दरम्यान चार दिवसीय शरद कृषी महोत्सव-2019 अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती विषयक कृषी, खते, शेतीसाधने, ऍटोमोबाईल,गृहपयोगी वस्तु वगैरे जवळपास 250 पेक्षा जादा स्टॉल असुन प्रदर्शनात प्रवेश विनामुल्य आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी प्रर्दशनातून आधुनिक माहितीचे दालन उपलब्ध होणार आहे. पद्मविभूषण खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याचे उद्‌घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते (शनिवार, दि.2) होणार असल्याचे इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले.
शरद कृषी महोत्सवा निमित्त पत्रकार परिषदेकरिता उपसभापती यशवंतराव माने, संचालक मधुकर भरणे, दत्तात्रय सपकळ, दत्तात्रय फडतरे, संतोष वाबळे, अनिल बागल, संग्रामसिंह निंबाळकर, निर्मला अंकुशराव रणमोडे, स्वाती भाऊसाहेब सपकळ, गणेशकुमार झगडे, शिवाजी इजगुडे, आबा देवकाते, रोहित मोहोळकर, सचिन देवकर, सुभाष दिवसे, मेघःशाम पाटील, महावीर गांधी, भानुदास सपकळ, नानासाहेब शेंडे, सचिन भाग्यवंत, व सचिव जीवन फडतरे उपस्थित होते.
सभापती म्हणाले की, शरद कृषी महोत्सव 2019 मध्ये कृषी, पशु-पक्षी,जनावरे प्रदर्शन, डॉग शो शिवाय यासह एकमेव घोडे बाजार प्रदर्शन तसेच शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, खवय्यासाठी खाऊ गल्ली, महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम व विविध मनोरंजन ड्रेगन/पाळणे याचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर बाजार समितीचे सुसज्ज व अद्यावत बाजार संकुल असुन त्यामध्ये होणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि. 30) होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रेय भरणे असणार आहेत. समारोप समारंभ व बक्षीस वितरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येईल. खासदार विजयसिंह मोहिते पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती सभापती जगदाळे यांनी दिली.

  • गतवर्षी बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन व घोडे बाजार, जनावरे प्रदर्शनास शेतकरी बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. बाजार समिती प्रगतीपथावर पोचली आहे. यामुळे उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तसेच विविध कुस्ती क्रिडा क्षेत्रातील विजेत्यांचा सन्मान पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा बाजार समितीचा मानस आहे.
    – अप्पासाहेब जगदाळे, सभापती, इंदापूर बाजार समिती
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)