शेतकऱ्यांना दुष्काळात तरकारी पीकांचा आधार

बारामती तालुक्‍यात नगदी पीकांत अंतर्गत पीक घेण्याकडे कल

माळेगाव- दुष्काळात पाण्याच्या नियोजनाबरोबर नगदी पिके घेण्याकडे बारामती तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या प्रकारे वाण लावून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या दुष्काळात आपला संसारगाडा चालविण्यासाठी तरकारी पीकांचा आधार शेतकऱ्यांना मिळत आहे. घरचे साठवणुकीतले धान्य असल्याने मीठ-मिरचीकरिता अशा तरकारी पीकांतून पैसे मिळत असल्याने नगदी पीकात अंतर्गत पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

पाण्याचा उपलब्ध पाणीसाठा पाहून आंतरपिके घेतली जात आहेत. यामध्ये उसात अंतर्गत पीक म्हणून कोबी, फ्लॉवर तर टोमॅटोच्या शेतात कारले लावण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.काही भागात वांग्याचे शेत बहरलेले आहे. परंतु, अशा पीकांची रानं सांभाळताना पाणी टंचाई बरोबरच किडी, अळींचा प्रार्दुभाव वाढला आहे. मुढाळे, लोणी, मुर्टी, पळशी, लोणीभापकर आदी भागातील शेतकरी निरनिराळी महागडी औषधे वापरुन पीकावरील रोगांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कारल्याला साधारण 70 रुपये किलोला दर आहे. तर, वांग्यालाही भाव मिळत असल्याने प्रत्यक्ष शेतातूनच ठोक व्यापाऱ्याला शेतमाल पाठविला जात आहे. बारामती तालुक्‍यातील आसपासच्या गावांमधुन टोमॅटो लागवड भरपूर झाली असली तरी रोगामुळे व कंपनीच्या खराब बियाणामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी पडत आहे. यामुळे टोमॅटोला दर मिळत आहे तर शेतमाल उपलब्ध नाही. बऱ्याच क्षेत्रांत टोमॅटो रोपांची उंची वाढली नसुन रोगामुळे फळधरणी होत नाही. मिरचीला भाव आहे, परंतु लागवड कमी क्षेत्रात झाली आहे.

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्‍यात सर्वाधिक गावे वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. सामन्यांपुढे पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. दुष्काळाच्या पाश्वभूमी नुकतीच बारामती तालुक्‍यातील मुढाळे येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर, बारामती तालुक्‍यात उन्हामुळे जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना पशुधनासाठी चारा मिळत नसल्याने गुरांच्या चाऱ्यासाठी मुख्य असलेले कडबा कुट्टी मिळेनासे झाले आहे. गुरांच्या चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे शेतकरी सांगतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.