शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी जिल्हा बॅंक कटिबध्द

आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले:वार्षिक सर्वसाधारण सभा: सभासदांना दहा टक्के लाभांश

सातारा,दि.28 प्रतिनिधी- जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कायमच शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी प्रयत्न केला असून यापुढे ही कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन बॅकेचे अध्यक्ष आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, यंदाच्या वर्षी बॅंकेला करपूर्व नफा 71 कोटी रूपये झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 68 वी वार्षिक सभा मंगळवारी सभागृहात संपन्न झाली. यावेळी बॅंकेचे संचालक व विधानपरिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर, उपाध्यक्ष सुनील माने, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, दादाराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, दत्तानाना ढमाळ, सुरेखा पाटील, नितीन पाटील, वसंतराव मानकुमरे, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बॅंकेचे ढोबळ एन पी ए चे प्रमाण 0.29 टक्‍के व निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. बॅंकेकडे 6 हजार 565 कोटी 76 लाखाच्या ठेवी असून एकूण कर्ज वितरण रुपये 4 हजार 453 कोटी 13 लाख आहे.2017-18 वर्षामध्ये बॅंकेस करपूर्व नफा रुपये 71 कोटी 25 लाख झालेला असून सर्व तरतूदीनंतर रुपये 35 कोटी निव्वळ नफा झालेला आहे . सभासदांना 10 टक्‍के लाभांशाची शिफारस केली आहे.याशिवाय सोसायटी कर्जदार सभासदांना वसुली प्रोत्साहन योजने अंतर्गत अल्पमुदत कर्जासाठी व्याज सवलत रुपये 2 कोटी 25 लाख, विकास संस्था वसुली प्रोत्साहन अंतर्गत 2 कोटी 75 लाख, शैक्षणिक कारणासाठीचे कर्जदार सभासदांना या आर्थिक वर्षातील देय व्याजापोटी वसुली प्रोत्साहन निधी रु 85 लाख इ.महत्वपूर्ण तरतुदी ढोबळ नफ्यातून शिफारस करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य शासन यांचे सुचनांनुसार बॅंकेने विकास संस्थांना 4 टक्‍के व शेतकरी सभासदांस 6 टक्‍के एवढया अल्पदराने पिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे.राज्य शासनाचे डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार जे शेतकरी अल्पमुदत पीककर्जाची परतफेड 30 जून 2018 पूर्वी करतील अशा शेतक-यांना सन 2017-18 साठी रुपये 1 लाखापर्यत 3 टक्‍के आणि रुपये 1 लाख ते 3 लाखापर्यत 1 टक्‍के व्याज सवलत मिळणार आहे आणि त्या सभासदाने केंद्र शासनाच्या धोरणानुसार वेळेत परतफेड केली तर त्याला 3टक्‍के व्याजदराने सवलत मिळणार आहे.म्हणजेच रुपये 1 लाखापर्यत पीक कर्ज शुन्य टक्‍के व्याजदराने आणि रुपये 1 ते 3 लाखापर्यत 2 टक्‍के दराने पीक कर्ज मिळणार आहे . मात्र बॅंकेने सन 2017-18 चे ढोबळ नफ्यातून 2 टक्‍के व्याज रकमेची तरतूद केली असल्याने शेतकरी सभासदांस रक्‍कम रुपये 3 लाखापर्यत “शुन्य’ टक्‍के दराने पीककर्ज उपलब्ध झाले आहे.

जिल्हयातील माण, खटाव, कोरेगांव या तालुक्‍यांमध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करणेकरिता तलावामधील गाळ काढणे, सलग समतोल चर खोदणे, जलसंधारणासाठी वेगवेगळया प्रकारचे बांध दुरूस्त करणे इ.कामे शेतकरी व ग्रामस्थांनी श्रमदानातून केली आहेत या कामकाजास गती मिळावी व वॉटर कप फौंडेशनने सुरू केलेल्या कामास चालना मिळणेकरिता या तालुक्‍यातील 164 गावांना अनुक्रमे रुपये 75 हजार, 55 हजार व 35 हजार या प्रमाणे रुपये 1 कोटी 60 हजार निधी बॅंकेने नफ्यातून दिला आहे, असे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी शेवटी सांगितले.

 

चार संचालकांची अनुपस्थिती
जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सभेस माजी खा.लक्ष्मण पाटील यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवून आली. त्याच बरोबर सतत बॅकेच्या कारभारा विरोधात तोफ डागणारे आ.जयकुमार गोरे यांच्यासह खा.उदयनराजे भोसले व माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर हे देखील आयोजित वार्षिक सभेला अनुपस्थित राहिले, त्यामुळे सभासदांमध्ये उलट सुलट तसेच आगामी निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा झडताना दिसून येत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)