शेतकर्‍यांना अवजारांऐवजी मिळणार अनुदान

कृषी स्वावलंबनासाठी शासनाची नवी योजना

कराड, दि. 30 (प्रतिनिधी) -शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कृषी अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत जावून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. सुलभ शेती करता यावी, यासाठी गेली अनेक वर्षांपासून औजारे पुरवली जात होती. मात्र ही योजना बंद करत मागासवर्गीय शेतकर्‍यांसाठी अनुदान देण्याची नवी संकल्पना सुरु करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे या योजनेचे नाव आहे.
या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, बोअरिंग, वीज जोडणी आकार, प्लॅस्टीक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदीसाठी अनुदान उपलब्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी पुरविण्यात आलेल्या औजारांमुळेही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. शेतातील मशागतीची कामे सुलभ होण्यास व आधुनिक पद्धतीने होण्यास मदत होत गेली. तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतला. प्रत्येक वर्षी पेरणीपूर्वी औजारे पंचायत समितीकडे उपलब्ध होत होती. गरजेनुसार त्याचे शेतकर्‍यांना वितरण केले जात होते. आता ही संकल्पना बंद करून शेतकर्‍यांनी स्वावलंबी व्हावे आणि त्यांना जास्तीत उत्पन्न काढता यावे, यासाठी कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे.
ज्या शेतकर्‍यांच्या स्वत:च्या नावे अथवा सामाईक 0.40 हेक्टर ते 6.00 हेक्टर शेतजमीन आहे व ज्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत आहे. किंवा ज्या शेतकर्‍यांची नावे दारिद्य्र रेषेखाली आहे. अशा शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी खाते उतारा, सात बारा आदीसह महत्त्वाची कागदपत्रे कृषी विभागात जमा करावयाची आहेत.
नवीन विहिरीसाठी 2.50 लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार, वीजपंपासाठी 25 हजार, वीज आकारासाठी 10 हजार, इनवेल बोअरसाठी 20 हजार, शेततळे व प्लॅस्टीक अस्तरीकरणासाठी 1 लाख, सूक्ष्मसिंचन साठी हेक्टरी 50 हजार, तुषारसाठी 25 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मागासवर्गीय वर्गासाठी ही योजना आहे. कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)