शेतकरी आंदोलनाचे राष्ट्रवादीवरच बुमरॅंग

बिलाचे सोडा अब्रुही गेली
सातारा,  (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यातील प्रभावी नेते असलेल्या भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांचे उसाची तोडणी होऊन आठ महिने उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात उसाचा पैसा आलाच नाही. त्यामुळे संधीसाधू राष्ट्रवादी प्रणित शे-सव्वाशे शेतकरी कार्यकर्त्यांनी ऊस बिलासाठी आंदोलन केले. याचा कोणताही परिणाम किसनवीर कारखाना संचालक व प्रशासनावर झाला नाही, उलट राष्ट्रवादीवरच हे आंदोलन बुमरॅंग झाले. बिलाचे सोडा शेतकऱ्यांच्या कळवळ्याची दाखवली जाणारी अब्रुही गल्याची चर्चा सध्य सुरु आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकारणावर स्व: यशवंतराव चव्हाण, किसन वीर, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, माजी आ. लालसिंगराव शिंदे यांनी किसनवीर कारखान्याची उभारणी केली. त्यावेळी ऊस उत्पादकांची संख्या कमी असल्यामुळे साखरेला चांगला भाव मिळत होता. तसेच इतर सहउत्पादनापासून कारखान्याच्या तिजोरीत भरभराटही होत होती. पण राजकीय स्पर्धा आणि सत्तेचा हव्यास यामुळे सध्या भुईंज येथील साखर कारखान्याच्या धुराड्यातून उसाऐवजी राजकारणाचा धूर बाहेर पडत आहे. सध्या या कारखान्याकडे 40 हजार सभासद असून आठ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करुन किसनवीर साखर कारखान्याने प्रतीटन 2770 रुपये दर देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही काळासाठी समाधान पसरले. विद्यमान संचालकांचा गुणगौरव करण्याची त्यामुळे स्पर्धा सुरु झाली. पण जेव्हा कारखान्यातील कामगारांनाच पगार वेळेत मिळेना, अशी अवस्था झाल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्याचबरोबर कर्जाचा डोंगर व व्याजाची डगर वाढू लागल्याने या कारखान्याला कर्ज काढल्याशिवाय नटबोल्टही बदलता येईना, अशी अवस्था झाली. सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे ऊसतोड झाल्यानंतर पंधरा दिवसांत पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आहेत. परंतु, गेल्या आठ महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे 70 ते 75 कोटी रुपये देण्यात आलेले नाहीत. आता व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनीच केली आहे.
गेल्या आठवड्यात किसनवीर साखर कारखान्याला कोंडित पकडण्यसाठी राष्ट्रवादीच्या युवा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा स्टंट करण्यात आला. पण जेमतेम शे-सव्वाशे कार्यकर्ते हजर राहिल्यामुळे अखेर या आंदोलनाची मोळी बांधून ती गुंडाळण्यात आली. ज्यावेळी शेतकरी ऊस बिलासाठी भांडत होते, त्यावेळी तुम्ही सत्ता दिली आहे, तुमचे उसाचे बिल तुम्हीच काढून आणा, असे सांगणारे आता आंदोलनासाठी फूस लावीत आहेत. विद्यमान चेअरमन मदनदादा भोसले यांना पुरस्कार देताना ज्येष्ठ नेते गौरवोद्गार काढतात, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार भ्रष्टाचाराचा आरोप करुन निवेदन देतात. ही बाजू उघड झाल्यामुळे या आंदोलनाला फारसे गृहीत धरण्यात आले नाही. त्यामुळे हे आंदोलन बुमरॅंग सारखे राष्ट्रवादीवरच उलटले आहे. या आंदोलनानंतर किसनवीर साखर कारखान्याने विम्याच्या पैशातून कारखान्याच्या वारसदारांना अर्थसहाय्य करुन आपण आजही सामाजिक काम करतो, हे दाखवून देण्यात यश मिळवले आहे. सध्या किसनवीर कारखान्याने कुडाळ येथील प्रतापगड व खंडाळा येथील कारखान्यासाठी मदतीचा हात दिला. आता याच हातावर बोजा पडल्यामुळे प्रशासनसुद्धा थकून गेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)