शेकडो झाडे जळाल्यानंतर वनविभागाला जाग

गोंदवले – माण तालुक्‍यातील पळशीतील माळी खोऱ्यात वनविभागाने मागील वर्षी झाडे लावली होती. पण वेळेवर पाणी न मिळाल्याने शेकडो झाडे जळाली आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने पुन्हा वृक्षारोपण सुरू केले आहे. वृक्षारोपणानंतर वर्षभरातच मोठ्या प्रमाणात झाडे जळाल्याने वनविभागाच्या कामाबद्दल प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.

माळीखोरा येथील शेकडो वर्षांपासूनचे ओसाड माळरान वनराईने फुलविण्यासाठी मागील वर्षी मार्डी म्हसवड मार्गावरील गंगाधर स्वामी मठ परिसरातील जवळपास पंचवीस हेक्‍टर परिसरात वनविभागाने तब्बल 15 हजार 625 वृक्षांची लागवड केली होती. या माळरानावर कडुलिंब, वड, पिंपळ, पिंपरण, उंबर, आवळा, शिसव अशा देशी झाडांची लागवड केली होती. परंतु, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेकडो झाडे पाण्याअभावी करपून गेली. वनविभागाने वेळेवर पाणीपुरवठा आणि वृक्षांची देखभाल केली असती तर झाडे जळाली नसती. आता पुन्हा लावलेली झाडे तरी वनविभाग जपणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कमी पावसाचा पट्टा, ग्रामस्थांतून चिंता

परिसरातील मार्डी, जाशी, रांजणी, माळीखोरा, माळवाडी या पट्टयात दरवर्षी पाऊस हुलकावणी देतो. माण तालुक्‍यात पाऊस झाला तरी हा पट्टा बऱ्याचदा कोरडाच राहतो. त्यामुळे येथील शेतकरी नेहमी चिंतेत असतो. येथे जवळपास 162 हेक्‍टरचा परिसर राखीव जंगलाचा असून वनविभागाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, अशी मागणी व्यक्त होत आहे. परिसरातील वृक्षलागवडीने पर्यावरणाचा समतोल साधला जाऊन पर्जन्यमान सुधारण्यास मदत होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. पण वनविभागाच्या दुर्लक्षामुळे त्यांनीच लावलेली झाडे देखभालीअभावी जळत असल्याने ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)