शेअर गुंतवणुकीतील काही आडवळणे, काही धोपट रस्ते (भाग-१)

७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी असा संपूर्ण आठवडा हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून जगभर साजरा होतो आणि भारतीय तरुणाई त्यास नक्कीच अपवाद नव्हती. व्हॉट्सॲपवर फिरलेले मेसेजेस, इन्स्टा वर अपलोड झालेले फोटो, फेसबूकवरील लाइक्स असा बराच लाल-गुलाबी धुरळा सोशल मीडियावर उडत होता आणि आपला बाजार देखील त्यास मूकपणे साथ देत होता. त्याप्रमाणं प्रथम ७ तारखेस रोज डे च्या दिवशी गुलाबामुळं समोरच्या व्यक्तीस जसं हवेत गेल्यासारखं वाटतं अगदी तोच प्रकार बाजाराच्या बाबतीत झाला. निफ्टीनं प्रथमच २४ सप्टेंबर २०१८नंतरची सर्वोच्च पातळी गाठली व तमाम गुंतवणूकदार हवेत गेले. परंतु जशी लाल गुलाबाची अपेक्षा असताना पिवळा गुलाब मिळाल्यावर अपेक्षाभंग होतो अगदी तसाच अपेक्षाभंग बाजारानं देखील केला, गुलाब तर मिळाला परंतु बहुतेक गुंतवणूकदार त्याचा रंग ओळखण्यात चुकले व दुसऱ्याच दिवशी असलेल्या प्रपोज डे दिवशी मंदीबाईंनी बाजारास प्रपोज कसलं तर चक्क गळच घातली व बाजार देखील विरघळला. मग, चॉकलेट, टेडी, प्रॉमिस, ह्ग, किस सर्व करून सुद्धा बाजार कशासही भीक घालेना,अगदी व्हॅलेंटाईन सुद्धा मंदीबरोबरच घालवला. ज्यांनी रोज डे ला योग्य रंग निवडला (ओळखला) ते आठवडाभर सुखी राहिले. ४ फेब्रुवारीच्या लेखात बाजार (निफ्टी५०) १०६०० – ११००० दरम्यान दोलायमान राहील असं म्हटलं होतं. ७ तारखेचा बंद भाव ११०६९ होता तर परवाच्या शुक्रवारचा निफ्टीचा न्यूनतम भाव होता १०६२०. असो, येणाऱ्या दिवसांत मुलांच्या परीक्षांच्या हंगामाबरोबरच गुंतवणुकीचा सिझन देखील चालू होतोय व त्यासाठी कोणतीही कसर न सोडता कसून तयारी तर चालूच असेलच, त्याअनुषंगानं आजच्या लेखात कांही मुद्दे आपण लक्षात घेऊयात.

मागील आठवड्यात आपण पाहिलं की कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्स हे त्यांच्या उच्चांकी पातळीपासून किती प्रमाणात घसरले आहेत. त्याचप्रमाणं कांही कंपन्यांचे समभाग हे त्यांच्या वर्षातील नीचांकी पातळीला आले आहेत. अनेकदा अशा कारणानं आपण असे शेअर घेतो परंतु ते घेण्याआधी अशा प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव का पडलेत ते तपासून पाहणं गरजेचं आहे. समजा कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात भडकल्या व त्यामुळं त्या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांचे शेअर्स खाली आले तर त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही, परंतु त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअर्सचे भाव न पडता एका विशिष्ट कंपनीच्या शेअर्सचे भाव अचानक कोसळले तर मात्र त्यात गुंतवणूक न केलेलीच बरी.

दुसरा मुद्दा हा की, अनेक वेळा गुंतवणूकदार बऱ्यापैकी चांगले, म्हणजे नावाजलेल्या कंपन्यांचे शेअर्स हे त्यांच्या ५२ आठवड्यांच्या न्यूनतम पातळीवर आले की खरेदीस योग्य म्हणून ते घ्यायला धजावतात परंतु अशा ठिकाणी त्या कंपनीच्या शेअरच्या भावांचामागील कांही वर्षांचा आलेख देखील तपासून पाहणं गरजेचं आहे. उदा. शुक्रवारी, वेदांता कंपनीच्या म्हणजेच जुन्या सेसागोवा या कंपनीच्या शेअर्सनं मागील एका वर्षातील (जुलै २०१६ नंतरची) नीचांकी पातळी (१४६) नोंदवली, परंतु जर या शेअरच्या आलेखावर नजर टाकल्यास लक्षात येईल की या शेअरचा मागील तीन वर्षांतील नीचांक हा ६६ रुपये आहे तर तोच मागील २० वर्षांतील न्यूनतम भाव हा १ रुपया (समायोजित) आहे. मग अशा कंपनीचा शेअर मागील वर्षभरात निम्मा झाला म्हणून त्यात गुंतवणूक करायची का, मागील तीन वर्षांतील न्यूनतम भावाच्या दुपटीपेक्षा अजूनही जास्तच आहे म्हणून वाट पाहायची हा अभ्यासाचा भाग आहे.

शेअर गुंतवणुकीतील काही आडवळणे, काही धोपट रस्ते (भाग-२)

तसंच, दुसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे हिंदुस्थान ॲल्युमिनिअम या कंपनीच्या शेअरचं. या शेअरनं मागील आठवड्यात ५२ आठवडी नीचांकी भाव नोंदवला (१८२.२० रु.) तर याच कंपनीचा मागील तीन वर्षांतील नीचांक होता ६२ रुपये, म्हणजे आजच्या तारखेस अजूनही हा शेअर तिप्पट भावात आहे जरी तो सर्वोच्च भावापासून (२८४ रु.) सुमारे १०१ रुपये किंवा दुसऱ्या शब्दांत म्हणायचं तर ३६% इतका पडला असला तरीही.

Leave A Reply

Your email address will not be published.