शेअरबाजाराला नफेखोरीचे ग्रहण 

रुपया घसरण्याचा आणि क्रूड महाग होण्याचा परिणाम 
मुंबई: कालपासून चलनबाजारात रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत असल्यामुळे शेअरबाजारात नफेखोरी वाढू लागली आहे. त्यामुळे कालच्याप्रमाणे आजही शेअरबाजार निर्देशांक कमी झाले.
निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. शुक्रवारी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर निर्देशांकांना थोडीफार दिशा मिळण्याची शक्‍यता आहे. रुपया घसरत असल्यामुळे बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरवर दबाव येत आहे.
त्याचबरोबर जागतिक बाजारात पुन्हा क्रुडचे दर वाढले आहेत. अमेरिकेचा तेलसाठा कमी झाला आहे. त्याचबरोबर इराण आणि व्हेनेझुएला येथील तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे क्रुडची मागणी वाढून भाव वाढत आहेत. आता क्रुडचे दर 77 डॉलर प्रति पिंप गेले आहे.
सकाळी गुंतवणूकदार आशावादी होते. त्यामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 38819 अंकापर्यंत वाढला होता. मात्र, नंतर सेन्सेक्‍सला ती पातळी राखता आली नाही. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 32 अंकांनी म्हणजे 0.08 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 38690 अंकावर बंद झाला. रुपया घसरल्यामुळेच काल सेन्सेक्‍स 173 अंकानी कमी झाला होता.
त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 अंकांनी कमी होऊन 11676 अंकावर बंद झाला. रुपया घसरल्यामुळे काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1415 कोटी रुपयाच्या शेअरी विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1114 कोटी रुपयांच्या शेअर खरेदी केली.
आजच्या घसरणीच्या काळातही दूरसंचार, आरोग्य, धातू, वीज, पायाभूत सुविधा, रिऍल्टी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकांत वाढ झाली.
रुपयाचे मूल्य घसरण्यामुळे निर्यात करणाऱ्या कंपन्यांना तुलनेने अधिक लाभ होत आहे. मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या घसरण्यामुळे मुख्य निर्देशांक जरी कालपासून कमी होत असले तरी आज लहान कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारीत मिडकॅप 0.43 टक्‍क्‍यांनी तर स्मॉलकॅप 0.27 टक्‍क्‍यांनी वाढला. आगामी काळात गुंतवणूकदार अधिक सावध राहण्याची शक्‍यता आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)