शुभम शिर्के खून प्रकरणातील आरोपीला दुहेरी जन्मठेप

विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांचा आदेश 


परिस्थितीजन्य पुरावे ठरले महत्त्वाचे

पुणे- दहावीमध्ये शिकत असलेल्या शुभम शिर्के नावाच्या मुलाचे अपहरण करून, त्याच्या वडिलांना 50 हजार रुपयांची खंडणी मागून खून केल्याप्रकरणात अमित नायर याला दुहेरी जन्मठेप आणि 16 हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. दंडाच्या रकमेतील 15 हजार रुपये नुकसानभरपाईपोटी आणि गुन्ह्यात खंडणी स्वरूपात स्विकारलेले 15 हजार रुपये शुभम याच्या आई-वडिलांना देण्यात यावेत, असे न्यायालयाने आदेशाअ नमुद केले आहे. या खटल्यात शिक्षेसाठी परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले.

अमित रामचंद्र नायर (वय 20, आपटे कॉलनी, भोसरी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. दीघी येथे 31 मार्च 2012 रोजी ही घटना घडली. दोन अल्पवयीन आरोपी आणि नायर या तिघांनीही संगणमत करून खंडणीसाठी शुभम शिर्के (वय 15) याला पळवून नेण्याचा कट रचला. या तिघांनीही या खटल्यातील एका साक्षीदाराच्या घरी जाऊन नायर याच्या आई वडिलांना शिरगाव येथील मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचे आहे, असे खोटे सांगून त्यांची मारूती कार घेतली. त्यानंतर शुभमला मोबाइलवर फोन करून सोबत येण्यास तयार केले. या तिघांनी शुभमच्या घराजवळ येऊन कार थांबवून एकाने शुभमला हाक मारून घरातून बोलावून घेतले. कारमधून दिघी गावाच्या पूर्वेकडील टॅंक रोडजवळील लष्कराच्या जंगलात शुभमला उतरवले. शेजारील खड्ड्यात नेऊन एक अल्पवयीन आरोपी आणि नायर याने त्याला धरून ठेवले. दुसऱ्या अल्पवयीन मुलाने सुरीने त्याच्यावर वार केले. सुरी पातळ असल्याने सुरीचे पाते वाकले म्हणून दुसऱ्या अल्पवयीन आरोपीने कमरेचा पट्टा काढून पहिल्या अल्पवयीन आरोपीकडे दिला. त्याने या पट्याने शुभमचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. तो जिवंत राहणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी त्याच्या गळ्यावर पेपर कटरने वार करण्यात आला.

त्यानंतर या तिघांनी खंडणीसाठी कॉईन बॉक्‍सवरून शुभमच्या वडिलांना मोबाइलवर फोन केला. तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, 50 हजार रुपये घेऊन या, असे सांगितले. खंडणी घेऊन प्रथम भोसरी, नाशिकफाटा येथील एच पी पेट्रोल पंप येथे बोलावले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून शेवटी भोसरीतील साईसागर हॉटेल येथे त्यांना बोलावून घेतले. नायर हा भोसरी येथील कल्पना हॉटेलच्या पोटमाळ्यावर बसून राहिला. दुसरा अल्पवयीन आरोपी पानटपरी जवळ थांबला. एका अल्पवयीन आरोपीने दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधलेल्या अवस्थेत शुभमच्या वडिलांजवळ जात किती पैसे आणले आहेत, बरोबर पोलीस आहेत का, असे विचारले. त्यावर पंधरा हजार आणले असून पोलिसांना कळवले नाही, असे सांगत शुभमच्या वडिलांनी त्याला पैसे दाखवले. तेव्हा शुभमच्या आईने शुभमला सोडा, अशी विनवणी केली. त्यानंतर त्याने नायर याच्याशी चर्चा करून परत फिर्यादीजवळ जाऊन खंडणीची रक्कम घेतली. उर्वरित रक्कम कधी देणार,असे विचारले. त्यांना शुभम कोठे आहे, असे विचारले असता, तो ठीक आहे. तुमच्या मागोमाग घरी येईल, असे सांगून ते निघून गेले.

या प्रकरणी भारतीय दंड विधान कायदा कलम 363,364 अ, 383,387,302, 120 ब,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. निकम यांनी या खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयापुढे सादर केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत आरोपी नायरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर इतर दोन अल्पवयीन आरोपींविरूद्धची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे.
“माणूस खोटे बोलू शकतो. मात्र, परिस्थिती खोटे बोलू शकत नाही. या घटनेत कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. सरकार पक्षातर्फे 17 परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयात मांडण्यात आली. न्यायालयाने ती ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली आहे,’ असे ऍड. निकम यांनी सांगितले.

भादवी कलम सुनावलेली शिक्षा – दंड न भरल्यास शिक्षा
302, 120 ब -जन्मठेप आणि 5000 दंड, -अतिरिक्त सहा महिने शिक्षा

364 अ, 120 ब – जन्मठेप व 5000 दंड – अतिरिक्त सहा महिने शिक्षा

363,120 ब -तीन वर्ष सक्तमजुरी व 2000 दंड -अतिरिक्त एक महिना शिक्षा
387,120 ब -तीन वर्ष सक्तमजुरी व 2000 दंड – अतिरिक्त एक महिना सक्तमजुरी
120 ब – -तीन वर्ष सक्तमजुरी 2000 दंड -अतिरिक्त एक महिना सक्तमजुरी

 

टीव्हीवरील गुन्हेगारी मालिका पाहून केले हे कृत्य
भोसरीच्या प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा शुभम विद्यार्थी होता. त्याने परीक्षा दिली होती. खून झाल्यानंतर परीक्षेचा निकाल लागला. त्यावेळी शुभमला तब्बल 83 टक्के गुण मिलाले होते. गळा आवळून आणि चाकूचे वार करून आरोपींनी शुभमचा खून केला होता. त्याचा मृतदेह दिघीतील मोकळ्या जागेत एका खड्ड्यात पोलिसांना मिळाला होता. त्यांच्या मित्रांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हे खून प्रकरण समोर आले. टीव्हीवरील ” सीआयडी’ ही गुन्हेगारीविषयक मालिका पाहून हा खून केल्याची कबुली तिघांनी दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)