शुभमंगल कार्यालयात “सावधान’; वाढल्या चोऱ्या

– एन. आर. जगताप

सासवड -पुरंदर तालुक्‍यात सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असल्यामुळे जवळजवळ सर्वच मंगल कार्यालयामध्ये बुकिंग फुल आहे. थाटामाटात आणि भव्य लग्नसोहळा पार पाडण्यासाठी मोठमोठ्या मंगल कार्यालयांची मागणीही वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाई, फटाक्‍यांची आतषबाजी यामुळे विवाह सोहळ्याला वेगळीच रंगत चढत आहे, परंतु याचवेळी मंगल कार्यालयांमधील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे कार्यालये खरेच सुरक्षित आहेत का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नुकतेच मंगल कार्यालयात चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी अटक करून 92 तोळे सोने व कार जप्त केली असली तरी जिल्ह्यात अशा अनेक टोळ्या अजूनही कार्यरत आहेत. अशा टोळ्यांना वचक बसविण्यासाठी पोलिसांनी चोरांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे.

लग्न सोहळा म्हटले की दाग-दागिने, रोख रक्कम, किंमती वस्तू यांची रेलचेल असते.लग्न सोहळा हे चोरांना आयते निमंत्रणच असते. लग्न समारंभात हजारो लोक एकत्र येत असतात. अशावेळी वऱ्हाडी बनून कार्यालयातून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लग्नसमारंभ पार पडत असताना मंगल कार्यालयामध्ये सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले जाणे अत्यंत आवश्‍यक आहे. यामध्ये मंगल कार्यालयाच्या गेटवरती सुरक्षारक्षक असणे, कार्यालयात सीसीटीव्ही लावणे, कार्यालयाला वॉल कम्पाउंड असणे गरजेचे आहे, परंतु तालुक्‍यातील अनेक मंगल कार्यालय चालकांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केलेले दिसत आहे. त्यामुळे कार्यालयात चोरी करणे चोरांना सोपे झाले आहे.

तालुक्‍यातील बहुसंख्य मंगल कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे काही कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही हे फक्त शोपीस म्हणूनच लावल्याचे दिसून येत आहेत. अनेक लग्न रात्रीच्या वेळी पार पाडली जातात. हलक्‍या दर्जाचे सीसीटीव्ही बसविण्यावर मंगल कार्यालय मालकांचा भर असल्यामुळे सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या अंधारातील फुटेज व्यवस्थित रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग असूनही संशयित व्यक्ती अथवा चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे चोरांचा छडा लावणे व गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास पोलीस प्रशासनालाही असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मंगल कार्यालयांमध्ये जी महत्त्वाचे ठिकाणे आहेत. त्याच ठिकाणी नेमके सीसीटीव्ही बसविलेले नसतात. त्यामुळे मंगल कार्यालयांमधील सीसीटीव्ही हे शोभेची वस्तू न राहता त्याचा खरंच उपयोग होणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभमधील नाचण्यावरून भांडणे होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, मंगल कार्यालयांचे स्वतःचे सुरक्षारक्षक नसल्यामुळे या प्रकारांना वेळीच आळा घालणे शक्‍य होत नाही. लग्नसमारंभात दोन्ही वधू-वर पक्षाचे नातेवाईक हे नवीन असतात. त्यामुळे नेमका अंदाज येत नाही की नातेवाईक कोण आणि चोर कोण. त्यामुळे आपल्या कार्यालयात होणाऱ्या आनंदावर चोरीमुळे विरजण पडू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी मंगल कार्यालयांची आहे.

पुरंदर तालुक्‍यातील मंगल कार्यालये सुरक्षा नियमांचे खरंच पालन करतात का? याचेही ऑडिट पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी करणे गरजेचे आहे. ज्या मंगल कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणे आवश्‍यक आहे. सुरक्षा नियमांचे पालन केले गेले आहे की नाही याची तपासणी करूनच मंगल कार्यालयांना परवानगी देणे गरजेचे आहे. कार्यालयांमध्ये आगप्रतिबंधक उपकरणांची सोय आहे का? संकट काळात लवकर बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन दरवाजांची सोय आहे का? याची शहानिशा प्रशासकीय यंत्रेणेकडून केली जाणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेचे देखील या गंभीर बाबींकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करण्यावरच भर असल्याचे दिसून येत आहे. आग, भूकंप, वादळ, शॉर्टसर्किट अशा दुर्घटनावेळी लग्नासाठी हजारोंच्या संख्येने एकत्रित आलेल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थाच नसल्याचे दिसून येत आहे.

मालकांवरच गुन्हे का दाखल करू नये?
मंगल कार्यालयातील दागिने, रोख रक्कम व वाहन चोरीची गुन्ह्यांमध्ये मंगल कार्यालयांच्या मालकांवरच गुन्हे दाखल का करू नयेत? असाही सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. कारण मंगल कार्यालयातील लग्न समारंभाच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही सर्वस्वी मंगल कार्यालयाच्या मालकाची असते.

नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे
पुरंदर तालुक्‍यातील मंगल कार्यालयांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. अशावेळी ज्यांचा लग्न सोहळा आहे त्यांनीही आपल्या मौल्यवान वस्तू, दागने, रोख रक्कम, मोबाइल, वाहने यांची काळजी घेणे व त्यांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता पाळणे आवश्‍यक आहे. केवळ मंगल कार्यालयाच्या मालकांवर व पोलिसांवर विसंबून राहणे योग्य ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.