शिवाजी विद्यापीठात एसएसबी मार्गदर्शन कक्ष सुरू करणार – शिंदे

कोल्हापूर  – सेनादलांत अधिकारीपदी भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) परीक्षांसाठी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन कक्ष सुरू करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

कुलगुरू डॉ. शिंदे यांना आज सकाळी राष्ट्रीय छात्र सेनेचे (एन.सी.सी.) मानद कर्नलपद प्रदान करण्याचा समारंभ पार पडला. पदस्वीकृतीनंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ब्रिगेडियर पी.एस. राणा, कर्नल एम.एम. चौधरी, मानद मेजर रुपा शहा व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने एनसीसीसाठी आपल्या परिसरात मोठी जागा उपलब्ध करून देऊन एनसीसीच्या उपक्रमांना चालना देण्याचे काम चालविले आहे. त्याचप्रमाणे पदवी स्तरावर एनसीसी हा विशेष लष्करी अभ्यासक्रमही विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठात ज्याप्रमाणे युपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते; त्याच धर्तीवर एसएसबी परीक्षांसाठीही मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येईल.

१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनांच्या प्रसंगी विद्यापीठ प्रांगणात एनसीसीची परेड आयोजित करण्यासंदर्भातही एनसीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने समाविष्ट होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा स्पर्धांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांना काही सवलती अगर अधिक गुण प्रदान करता येतील का, या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ब्रिगेडियर पी.एस. राणा म्हणाले, एनसीसी ही भारतीय लष्करापेक्षाही अधिक युवकांची संख्या असणारी शिस्तबद्ध संघटना असून प्रशिक्षित व देशप्रेमाने भारित नागरिक निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या संघटनेच्या कार्याला बळकटी प्राप्त होण्यासाठी शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आदी व्यवस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे. विद्यापीठाच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग प्राप्त होऊन नूतन मानद कर्नल कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात एनसीसीची जोमाने वृद्धी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)