गटा-तटामुळे विधानसभेतही लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
– संजोक काळदंते
ओतूर – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष कार्यकर्ते व काही नेत्यांमधील गट-तट शिवसेना उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे पाहायला मिळाले. अशीच परिस्थिती विधानसभेला राहिल्यास शिवसेना पक्षातील दुफळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार असल्याचे तालुक्यातून सध्या बोलले जात आहे.
झालेली लोकसभा निवडणूक व या निवडणुकीच्या तोंडावर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश व त्यामुळे नाराज झालेल्या गटनेत्या आशा बुचके या कारणांनी शिवसेनेत झालेली दुफळी शिवसेनेमध्ये बेरजेच्या राजकारणाऐवजी वजाबाकीची ठरली. त्यात कार्यक्षम असलेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा झालेला पराभव जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडलेला आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे सध्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करीत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास प्रबळ झालेला आहे.
यातच आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरसावले असून कोणत्याही परिस्थितीत जुन्नर तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचाच केल्याशिवाय चैन पडणार नाही, असे ठाम मत मांडताना दिसत आहेत. जुन्नर विधानसभा निवडणुकीकरिता गेली पाच वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून व कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत त्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके या शिवसेना पक्षाच्या प्रबळ उमेदवार होत्या; मात्र आमदार सोनवणे यांच्या शिवसेना एंट्रीने बुचके व कार्यकर्त्यांना धक्का पोहोचला आहे. आमदार शरद सोनवणे यांनीदेखील वाढता जनसंपर्क तसेच विविध विकास कामांमधून आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पक्षातील गट-तट निवडणुकीपर्यंत असेच राहीले तर मात्र या सर्व गोष्टी आणि केलेली कामे हे निष्फळ ठरतात की काय? अशी शंका दोन्ही गटांमधून व्यक्त होत आहे. याचाच फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला होईल असे काही चिन्ह दिसू लागली आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र सध्यातरी तालुक्यात स्पष्ट होत आहे. ही जागा आघाडीमधून राष्ट्रवादीला व युतीमधून शिवसेनेला दिली जाणार आहे, असा विश्वास दोन्ही पक्षांतील प्रबळ दावेदार यांना असल्याने ते गेली अनेक दिवसांपासून विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत, असे चित्र विविध कार्यक्रमांना त्यांच्या लागलेल्या हजेरीमधून दिसते. जुन्नर तालुक्यामध्ये प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवारांच्या लढतीत इतर पक्ष उदाहरणार्थ वंचित बहुजन आघाडी, रासप, बसप यांच्यामधील नेतृत्व देखील जुन्नर तालुक्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांची भूमिका देखील या निवडणुकीकरिता अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे.
या नावांची आहे चर्चा
जुन्नरच्या आमदारकीकरिता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष अतुल बेनके, आमदार शरद सोनवणे, गटनेत्या आशा बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शिवसेना समन्वयक संभाजी तांबे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान घोलप, शरद सहकारी बॅंकेचे संचालक विनायक तांबे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगत आहे. उद्योजक नितीन भद्रिगे यांचे तालुक्यांमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेत्यांशी हितसंबंध आहेत तसेच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार असल्याने त्यांच्या नावाची चर्चा विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता होत आहे.