शिवसेनेचे उपनेते राठोड यांच्यावरील तडीपारीच्या प्रस्तावावर सुनावणी

शहर पोलिसांकडील सुनावणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार

नगर –शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांना दोन वर्षासाठी शहरातून तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. या प्रस्तावावर म्हणणे सादर करण्यासाठी राठोड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हजर झाले होते. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या दालनात तडीपारीच्या प्रस्तावाच्या नोटिसीवर राठोड यांनी म्हणणे मांडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहराची शांतता धोक्‍यात आली आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे. राठोड यांच्याविरोधात पोलिसांवर दगडफेक करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे गुन्हे दाखल आहेत. राठोड यांच्यामुळे शहरात वारंवार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो, असा आरोप पोलिसांनी प्रस्तावातून केला आहे. त्यामुळे त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात यावे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी हा प्रस्ताव चौकशीसाठी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे पाठविला आहे. मिटके यांनी या प्रस्तावावर चौकशीसाठी राठोड यांना म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली होती. राठोड यांनी या नोटिसीनुसार आज दुपारी मिटके यांची भेट घेऊन म्हणणे सादर केले. या प्रस्तावावर चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून पुढील कारवाईसाठी हा प्रस्ताव पुन्हा प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर होईल, असे सांगण्यात आले आहे.

तेव्हा दिलासा, आता खुलासा !

महापालिका निवडणुकीच्या काळात शहरातील सुमारे 751 जणांवर तडीपारीचा कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांवर ही कारवाई होती. शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर देखील कारवाई प्रस्तावित होती. परंतु वैद्यकीय कारणास्तव त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडील हे प्रस्ताव तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे कारवाईसाठी आले होते. त्यावेळी राठोड यांना दिलासा मिळाला होता.

अनिल राठोड यांच्यावर पाच गुन्हे

सरकारी कामात अडथळे आणून नुकसान करणे, गैरकायद्याची मंडळी जमावून अनाधिकृतपणे प्रवेश करणे, जमावाने विटंबना करणे, जाळपोळ व दरोडा घालणे, असे गुन्हे दाखल आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात चार आणि तोफखाना पोलीस ठाण्यात एक असे हे पाच गुन्हे दाखल आहेत. 1996 मध्ये एक 2004 मध्ये दोन, 2012 मध्ये एक आणि 2018 मध्ये एक असे हे गुन्हे दाखल आहेत. केडगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांडानंतर दगडफेक झाली होती. सरकारी कामात अडथळा आणला होता.

शस्त्र परवाना रद्दचा प्रस्ताव पडून

शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडे पिस्तुल परवाना आहे. राठोड यांच्याकडील शस्त्र परवाना क्रमांक 680 आहे. केडगाव येथील दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाने हा शस्त्र परवाना रद्द व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे नोव्हेंबर 2018 मध्ये प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर अजून कार्यवाही प्रस्तावितच आहे. राठोड यांच्याबरोबर आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, दिलीप सातपुते व सचिन जाधव यांचाही शस्त्र परवाना रद्दसाठी प्रस्ताव आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)