शिवसेनेचा ‘बाण’ बुचकेंच्या जिव्हारी

हकालपट्टीनंतर वरिष्ठ नेत्यांचे मात्र तोंडावर बोट : जुन्नर शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण

– श्रीकृष्ण पादिर

पुणे – जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर बुचके यांना मानसिक धक्का बसला. रक्‍तदाब आणि साखर वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर मग कार्यकर्त्यांची, तालुक्‍यांतील नेत्यांची त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली. लोकसभा निवडणुकीच्या बोचऱ्या पराभवानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. राजकारणातील चाणक्‍य प्रशांत किशोर यांच्या अहवालानंतर बुचके यांच्या कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात असली तरी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी याबाबत बोलायला तयार नाहीत. या हकालपट्टीनंतर शिवसेनेने मात्र गद्दारांना थारा नाही, असा जणू इशाराच दिला आहे. एवढ्या घडामोडींनतर शिवसेनेसाठी हे राजकारण पारदर्शी होणार की वजाबाकीचे हे येणारा काळच ठरवेल.

जुन्नर तालुक्‍यात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांना 41 हजार 500 मतांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी मिळण्याची विविध कारणे होती. पहिले कारण म्हणजे अमोल कोल्हे स्थानिक असल्यामुळे त्यांना मिळाली सहानुभूती. माळी, मुस्लिम आणि आदिवासी यांची त्यांना मिळालेली साथ. आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश आणि या प्रवेशामुळे बुचके गटातील तटस्थ राहणारे शिवसैनिक. एका बाजूला प्रचारात बुचके सक्रिय दिसत होत्या; मात्र त्यांचे कार्यकर्ते आढळरावांच्या विरुद्ध पोस्ट टाकण्यात मशगुल होते. त्यांचे अनेक जवळचे कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त राहिले होते. आदी कारणांमुळे जुन्नर तालुक्‍यातून शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर पडल्याचे दिसले.

आमदार शरद सोनवणे यांचा प्रवेश निश्‍चित झाल्यावर बुचके यांनी राजीनामा देण्याची धमकी पत्रकार परिषदेत दिली होती. सोबतच अनेक कार्यकर्तेही राजीनामे देणार होते; परंतु बुचके यांची हकालपट्टी झाल्यानंतरही कुठल्याही प्रमुख नेत्यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले नाही, त्यांनी फक्त भेट घेऊन सांत्वन केले. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिवसभर गर्दी केली होती. यामध्ये कार्यकर्ते, नेते, विरोधी पक्षातील नेते आदींनी भेट दिली.

शरद सोनवणेंचा मार्ग मोकळा
महत्त्वाचा प्रश्‍न असा आहे की, या अपेक्षित कारवाईमुळे येत्या विधानसभेत शिवसेनेला फटका बसू शकतो का? वास्तविक पाहता आमदार शरद सोनवणे यांनी गेल्या पाच वर्षांत तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. शहरी भागापासून तालुक्‍याच्या ग्रामीण भागापर्यंत सर्व ठिकाणचे रस्ते अतिशय सुंदर करण्यात आलेले आहेत. यावर्षी भीषण दुष्काळ असतानाही पाण्याचे योग्य नियोजन करून जूनअखेरपर्यंत नागरिकांना व शेतकऱ्यांना पाणी पुरवले आहे. किल्ले शिवनेरी, विविध देवस्थाने, रुग्णांना मदत, दाऱ्याघाटाचा प्रश्‍न, समाजमंदिरे आणि शासनाच्या विविध योजना आदी कामांसाठी भरघोस निधी आणला आहे. अनेक मुजोर अधिकाऱ्यांना त्यांनी वठणीवर आणले आहे. कामातील प्रामाणिकपणा, बोलण्यातील नम्रपणा आणि दिलेला शब्द पाळण्याचा स्थायी स्वभाव यामुळे शरद सोनवणेंनी नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे खरा शिवसैनिक हा सोनवणे यांच्यामागे भक्कमपणे उभा राहील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. येत्या विधानसभेत शरद सोनवणे विरुद्ध अतुल बेनके अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत.

बुचके पुढचे पाऊल कसे टाकणार?
आशा बुचके यांचे राजकीय भविष्य काय? अशी चर्चा सर्वत्र आहे. मूळच्या भाजपच्या असलेल्या आशाताई पुन्हा भाजपकडे जातात का? किंवा राष्ट्रवादीत जाऊन जिल्हा परिषदेचे मोठे पद मिळवतात का? येत्या विधानसभेत अपक्ष म्हणून पुन्हा एकदा नशिब अजमावतील? आदी अनेक पोस्टमुळे व्हॉट्‌सऍपचे ग्रुप ओसंडून वाहत आहेत. भाजपमध्ये गेल्या तर तेथे अगोदरच राष्ट्रवादीकडून आलेल्या नेत्यांची गर्दी आहे. शिवाय सेना आणि भाजप यांची युती आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यानंतर भविष्यातही त्यांच्या हातात फारसे काय लागेल, असे चित्र नाही. जर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर त्यांची मूळची ओळख कट्टर शिवसैनिक ही त्यांना विसरावी लागणार आहे. शिवाय राष्ट्रवादीमध्ये विधानसभेसाठी अगोदरच नेत्यांची रीघ लागलेली आहे. त्यामुळे यांचा नंबर लागणे अशक्‍यप्राय दिसते. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती बुचके यांच्यासमोर आहे. त्यांच्या बोलण्यातील कडकपणा, अधिकाऱ्यांची बोलतानाची भाषाशैली, हम करे सो कायदा- हा स्वभाव आणि लोकसभेतील अपयश आदींमुळे ह्या कारवाईस सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे वेट ऍण्ड वॉच
या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. ताईंवर झालेला अन्याय, ताई विधानसभा लढविणारच अशा आशयाच्या पोस्टमधून त्यांचे बुचके यांच्यावरील “प्रेम’ दिसत असल्याचे विरोधकांचे मत आहे. येत्या विधानसभेत आशा बुचके फॅक्‍टर किती प्रभावशाली ठरणार, हे निकालांती स्पष्ट होणार आहे; मात्र बुचके यांनी राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिल्यास सेनेला ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.