शिवसेना संपविण्यासाठी विरोधकांकडून पोलिसांचा वापर ; उपनेते अनिल राठोड यांचा आरोप

केडगाव हत्याकांडातील आरोपी नगरमध्येच

नगर: मोठे गुन्हे दाखल असलेले अनेक गुंड पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात मोकाट फिरत आहेत. त्यांना तडीपार न करता माझ्यावर केवळ राजकीय गुन्हे असतानाही नोटीस पाठविली आहे. शिवसेना संपविण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असून प्रस्ताव करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राठोड म्हणाले, “शहरात शिवसेनाविरूध्द इतर सर्व पक्ष, असे चित्र आहे. सगळे एक झाले आहेत. त्यामुळे कुणाचे नाव घ्यायचे हाही प्रश्‍नच आहे. जनता यांच्याबरोबर नाही म्हणून अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा उद्योग सुरू केला आहे. नगरकरांसाठी गेली 25 वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून मी लढा देतोय. निवडणुकीच्या तोंडावर तडीपारीचा प्रस्ताव का? हे सांगण्याचीही गरज नाही. नगरकर सूज्ञ आहेत.’ माझ्यावर कारवाई, नोटीस काढून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न पोलिसच करत आहेत. शिवसेनेचा मंडप तोडून गणेशोत्सवात दंगल घडवून आणण्याचा डाव होता. तो आम्ही हाणून पाडला, असेही राठोड यांनी यावेळी म्हटले आहे.

पोलिस सध्या खूप दक्ष असल्याचे दाखवत आहेत. गुन्हा घडला की आरोपी अटक होतात. मग गेल्या 10 महिन्यांपासून केडगाव हत्याकांडातील आरोपी मोकाट कसे? असा सवाल राठोड यांनी यावेळी केला आहे. आरोपी नगरमध्येच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोतकर व ठुबे कुटुंबियांसह विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अनिल राठोड यांनी दिला आहे.

पाटील, शिंदे व परमार यांच्यावर निशाणा

तत्कालीन अतिरीक्त पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक अक्षय शिंदे व पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यावर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी यावेळी निशाणा साधला. आरोप केले आहे. या पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव विरोधी राजकीय पक्षाच्या बळाने तयार केला आहे. या प्रकाराला शिवसेना कधीच घाबरलेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघाडलेली आहे. हे वारंवार सिद्ध झाले आहे. शिवसेनेत राहून सर्वसामान्यांसाठी काम केले आहे. गेली 25 वर्षे तेच करत आलो आहे. तडीपारीचा प्रस्ताव, ही माझ्या कामाची पावती आहे. विरोधकांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्यावर मोहोर उठवली आहे. या प्रकाराला मी माझ्यापद्धतीने योग्यपद्धतीने उत्तर देणार असल्याचा इशारा अनिल राठोड यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)