शिवरीत पाण्यासाठी जीव धोक्‍यात

पालखी काळात प्रादेशिक योजना येणार अडचणीत

खळद – पिलाणवाडी (ता. पुरंदर) जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अडचणीत आली आहे. या योजनेवर अवलंबून असलेले शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज, एखतपूर, मुंजवडी, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे.

पिलाणवाडी जलाशयांमध्ये सध्या अतिशय कमी पाणीसाठा असून, तो दुर्गंधीयुक्त झाला आहे. हा पाणीसाठाही शिवरी प्रादेशिक योजनेच्या जॅकवेलपासून जवळपास शंभर ते दीडशे फूट लांब असून, त्या ठिकाणाहून उचलून तो जॅकवेलच्या कडेला सोडला जातो. येथून जवळपास 41 हॉर्सपॉवरच्या पंपाने पाणी शिवरी प्रादेशिकच्या फिल्टर प्लाण्टमध्ये सोडले जाते. मात्र, प्रत्यक्षात तीन हॉर्सपॉवरपेक्षाही कमी पाणी शिवरी फिल्टर प्लाण्टमध्ये पोहोचते. यामुळे या योजनेच्या लाभार्थी गावांमध्ये सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, तर याच गावच्या वाड्या-वस्त्यांना जवळपास 14 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

सध्या येथील परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी खोलवर गेल्याने नागरिकांना सहज पाणी उपलब्ध होत नसून, महिलांना डोक्‍यावर हंडा घेऊन पाण्यासाठी परिसरात वणवण करावी लागत आहे.

अवघ्या दहा दिवसांनी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीसह अन्य लहान-मोठ्या पालख्या या मार्गाने पंढरपूरकडे जाणार आहेत. शिवरी येथे दुपारच्या विसाव्यासाठी हा पालखी सोहळा थांबतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. मात्र, सध्या पिलाणवाडी जलाशयामध्ये असणारा पाणीसाठा पालखी काळापर्यंत टिकेल की नाही आणि टिकला तर तो पिण्यायोग्य असेल की नाही, याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे तातडीने पाण्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

पाणी टंचाईला प्रशासनच जबाबदार
या भागात सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी पिलाणवाडी जलाशयातील शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा बंद करून हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, यावर प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने मोठ्या प्रमाणावरती शेतीसाठी पाणी उपसा झाल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

योजनेचे नूतनीकरण होणे गरजेचे
ही योजना साधारण वीस वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली असून त्यावेळची या भागातील लोकसंख्या व आजची लोकसंख्या पाहता यामध्ये मोठी तफावत झाली आहे. सध्या असणाऱ्या पाइपलाइनमधून नागरिकांना पाणीपुरवठा करणे हे मोठे जिकरीचे झाले आहे व यामुळे धरणात पाणी असूनही केवळ क्षमतेअभावी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करुन या योजनेचे नुतनीकरण करावे व यासाठी लोखंडी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करावा, जेणेकरून पाणी चोरीचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here