शिर्डीत ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा भर उन्हात दोन तास ठिय्या

साईबाबा संस्थानने लोअर केजीचे वर्ग वाढविण्याची मागणी : अन्यथा टाळे ठोकू : कैलास कोते
शिर्डी – साईबाबा संस्थानने लोअर केजीचे वर्ग वाढवावे, यासाठी मागील दोन वर्षांपासून पालकांसह शिर्डी ग्रामस्थ संघर्ष करत आहेत. मात्र, साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त मंडळ कोणतीही दखल घेत नसल्याने संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी भर उन्हात दोन तास ठिय्या आंदोलन केले.
येत्या आठ दिवसांत व्यवस्थापन मंडळाने वर्ग वाढविण्याचा निर्णय न घेतल्यास 15 जूनला शाळेचे गेट बंद करून टाळे ठोकण्याचा इशारा प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिला.
एकीकडे पंतप्रधान “बेटी पढाव – बेटी बचाव’चा नारा देतात, तर दुसरीकडे राज्य सरकारने नियुक्‍त केलेले साईसंस्थानचे व्यवस्थापन मंडळ गेल्या दोन वर्षांपासून केजीचे वर्ग वाढविण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शिर्डी परिसरातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या संस्थानच्या अध्यक्षांसह विश्‍वस्त मंडळाच्या चुकीच्या धोरणाचा जाहीर निषेध करत कैलास कोते, साई निर्माणचे अध्यक्ष विजय कोते, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली साईसंस्थानच्या शैक्षणिक संकुलासमोर भर उन्हात बसून दोन तास आंदोलन करून विश्‍वस्त मंडळाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या वेळी साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, सुरक्षा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, मुख्याध्यापक वरघुडे आदी संस्थानचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी कैलास कोते म्हणाले की, शिर्डीच्या विकासासंदर्भात आम्ही बोललो तर संस्थानचे अध्यक्ष हावरे न्यायालयात जाण्याचा सल्ला देतात. आम्ही न्यायालयात जाणार नाही. शिर्डीच्या विकासासाठी व्यवस्थापन मंडळाच्या विरोधात भव्य स्वरूपात लढा उभारून अध्यक्षपदावरून हावरेंना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. मगरुरीची भाषा वापरून शिर्डीकरांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. दोन वर्षांत त्यांनी केवळ विकासाच्या गप्पा मारल्या, प्रत्यक्षात कोणतीच कृती केलेली नाही. साईसंस्थानने नवीन शैक्षणिक संकुल उभारून वर्ग वाढवावे, अशी मागणी सातत्याने केली जात असताना संस्थानने शासनाकडे वर्ग वाढविण्याऐवजी केवळ शिक्षक भरतीचा प्रस्ताव पाठविला.
या वेळी सचिन चौगुले यांनी आपल्या तुफानी शैलीत संस्थानच्या कारभाराचा समाचार घेतला. विश्‍वस्त मंडळाच्या विरोधात संघर्ष उभारून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात नगरसेवक सचिन कोते, अरविंद्र कोते, मच्छिंद्र कोते, जमादारभाई इनामदार, दत्ता कोते, संजय सदाफळ, सतीश कोते, शफीक शेख, पत्रकार वाल्मिक बावचे आदी सहभागी झाले होते.

पालकांकडून पैसे गोळा करून हावरेंना देणार…
साईसंस्थानकडे निधीची कोणतीही कमतरता नसतानाही शैक्षणिक संकुलाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये गोळा करून के.जी.त प्रवेश मागणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थ शुक्रवारी (दि. 1) विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत जमा होणाऱ्या रकमेची झोळी हावरेंना देण्याचा निर्णय पालक व ग्रामस्थांच्या आंदोलनात घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)