शिरूरमध्ये दुतर्फा वाहनांमुळे बजबजपुरी

शाळा, महाविद्यालय परिसरात पालकांकडून शिस्तीला तिलांजली : वाहतुकीचा खोळंबा

शिरूर – शिरूर शहरात विद्याधाम प्रशाला ते सी. टी. बोरा कॉलेज रस्त्यावर शाळा कॉलेज भरण्याच्या व सुटण्यापूर्वी याच रस्त्यावर दुतर्फा वाहने अस्ताव्यस्त लावल्या जात आहेत. त्यामुळे रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पालकांनी रस्त्यावर उभी केलेल्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना चालणे मुश्‍कील झाले आहे. जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडायची वेळ नागरिकंवर आली आहे. शाळा प्रशासन व पोलीस प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल पालक व नागरिकांतून उमटत आहे.

शहरात हजारो विद्यार्थी याच रस्त्याने ये-जा करीत असून असंख्य वाहनांमुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी सकाळी व संध्याकाळ दरम्यान वाहतूक पोलीस नेमणुकीची गरज आहे. शिरूर शहरात याच रस्त्यावर विद्याधाम प्रशाला, सी. टी. बोरा कॉलेज, आरएमडी शाळा, थिटें यांची शैक्षणिक संस्था आदी संस्थांत पंधरा हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हजारो विद्यार्थ्यांना सोडणे- नेण्याकरिता मोठ्या संख्येने पालकवर्ग येतात. हे पालक रस्त्यात किंवा रस्त्याच्या कडेला पाहिजे तशी वाहने लाऊन मुले शाळेतून येईपर्यंत गप्पा मारत असतात. त्यात रस्त्यावर ये- जा करणारे कंपनी बसेस, शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस, येणारे व जाणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर सकाळी दहापासून बारापर्यंत व संध्याकाळी पाचपासून ते सहापर्यंत नेहमी पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विद्याधाम प्रशालेसमोर शेकडो पालक, विद्यार्थी घरी घेऊन जाण्यासाठी वाहने रस्त्यावर उभे रहात आहेत. याही रस्त्यावर वाहतूक खोळंबलेली असते. हा रस्ता पार करून शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्‍यात घालून रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये- जा करावी लागत आहे. मोठी वाहने जात असल्यामुळे पायी चालणे जिकीरीचे झाले आहे. यासाठी शाळा, कॉलेजच्या प्रशासनाने स्वतंत्र स्वयंसेवक यावेळेत नियुक्‍त करण्याची गरज आहे.

शिरूर पोलीस प्रशासनाने शाळा सुटताना व भरते वेळेस वाहतूक व अपघात टाळण्याकरिता दोन पोलिसांची नियुक्‍ती करण्याची आवश्‍यकता आहे. नागरिक व पालकांना वाहने पार्क करण्याकरिता शिस्त लागावी, याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे; अन्यथा या भागांत वाहन चालविण्याची कसरतीचे प्रयोग सादर करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
शिरूर विद्याधाम प्रशाला ते बोरा कॉलेजदरम्यान सर्वत्र दुचाकी वाहने मनमानी पद्धतीने लावलेली असतात. त्यात विद्यार्थी वाहतूक करणारे बसेस, औद्योगिक वसाहतील कर्मचारी वाहतूक करणारे बसेसमुळे मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रशासनाने गंभीर हवे.
– निलेश कोळपकर, सामजिक कार्यकर्ते, शिरूर.


विद्याधाम प्रशालेच्या आवारात व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालकांची वाहने शाळा परिसरात शंभर मीटरवर दाटीवाटीने लावली जातात. रस्त्यावर जाणारी वाहने व शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थ्यांच्या गर्दीत मोठा अपघात घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व विद्याधाम प्रशासन यांनी भविष्यातील धोका ओळखून योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– पुष्पाताई मुकुंदराव आंबेकर, शिरूर.


विद्याधाम प्रशाला शिरुर, पुणे रस्त्यांवर शाळा भरणे व सुटण्याच वेळेस प्रशाला प्रशासन व पालकवर्गास आपली वाहने योग्य ठिकाणी लावावीत. जेणेकरून आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना ये- जा करण्यास अडचण होणार नाही. रस्त्यावरील वाहनांना अडसर होणार नाही. यासाठी शाळेने एक कर्मचारी तेथे ठेवावा. एक वाहतूक पोलीस शाळा परिसरात नियुक्‍तीची गरज आहे.
– विजय नर्के, अध्यक्ष, सोशल मीडिया, शिरुर भाजप.


विद्याधाम प्रशालेच्या संचालकांनी व कर्मचाऱ्यांनी गाड्या पार्किंगसाठी एक शिपाई गेटवर तैनात करावे. शिपायांना शाळेत प्रार्थना होईपर्यंत काहीच काम नसते. शाळेमध्ये एका लाईनीत 25 गाड्या पार्क केल्या तर सहा लाईनीत कमीत कमी 150 मोटारसायकली बसतील. तलाठी ऑफीसपासून शिरुर रोडपर्यंत कमीत कमी 500 मोटारसायकली बसतील. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोण. प्रशाला प्रशासन एकदम मंद आहे.
– बलराज मल्लाव, माजी शहर प्रमुख, शिवसेना

Leave A Reply

Your email address will not be published.