शिरवडे व कोपर्डे येथील रेल्वे फाटक दोन दिवस बंद

कोपर्डेहवेली – शहापूर शिरवडे रस्त्यावर असलेले रेल्वे फाटक क्र. 94 बुधवारी तर कोपर्डे हवेली नजीक असणारे कराड मसूर रस्त्यावरील मुख्य रेल्वे गेट गुरुवारी दुरुस्तीचे काम असल्याने गुरुवार, दि. 31 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी रोजी बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

पुणे ते मिरज रेल्वे लाईन मधील गेट क्रमांक 94, 96 च्या रेल्वे फाटकातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने चोवीस तासासाठी रेल्वे गेट बंद करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. गेटमधील रुळाची दुरुस्ती, रेल्वे रुळातील अंतर वाढले आहे तर ठिकठिकाणी खड्डे आहेत आदींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे कराड मसूर रस्त्यावरील गेट ओलांडून जाणारी वाहने बंद राहणार आहेत. तर शहापूर शिरवडे तासवडे या रस्त्यावरील वाहनेही बंद राहणार असल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यायी व्यवस्था म्हणून कोपर्डे हवेली रेल्वे गेटवरुन जाणारी वाहने रेल्वेच्या पश्‍चिम बाजुने पाणंद रस्त्याने नडशी पुलाच्या खालून जाऊ शकतात. तसेच मसूरहून येणारी वाहने शहापूर मार्गे जाऊ शकतात किंवा तासवडे पुलावरुन पुणे-बेंगलोरमार्गे कराडला जाऊ शकतात. तासवडेला जाणारी वाहने नडशीच्या रेल्वे पुलाखालून रेल्वेस्टेशन जवळून जाणाऱ्या नडशी शिरवडे अंतर्गत रस्त्यावर दुचाकी वाहनधारक ये-जा करु शकतात. असेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. रेल्वे फाटक बंद राहणार असल्याने रेल्वे प्रशासनाने परिसरातील ग्रामपंचायतीना तसेच कराड व मसूर येथील पोलीस स्टेशन, सह्याद्री सहकारी साखर कारखाना आदींना नोटीशीद्वारे माहिती दिली आहे.

वाहनधारकांनी दुसरा मार्ग निवडावा…

शिरवडे रेल्वे गेटचे काम बुधवारी तर कोपर्डे रेल्वे गेटचे काम गुरुवारी होत असल्याने पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक होऊ शकते. परंतु गतवर्षीचा कोपर्डे हवेली रेल्वे गेट दुरुस्तीचा अनुभव लक्षात घेता पर्यायी रस्त्याचा वापर करताना अनेक वाहनांची कोंडी झाली होती. त्यावेळी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. त्यासाठी वाहनधारकांनी एक दिवसासाठी दुसरा मार्ग निवडल्यास होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)