शिपाई ते साहेब म्हणतात, इथे सर्व शिस्तीत आहे

प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदींचा धाक
नगर – महानगरपालिकेत शिपाई ते साहेब आता इथे सर्व काही शिस्तीत सुरू असल्याचे सांगत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी येथील आयुक्तपदाचा प्रभार घेतल्यापासून बेशिस्त वातावरणाला आधी लगाम घातला आहे. त्याचे परिणाम येथे दिसून येत आहेत. कर्मचारी शिस्तवाढली तशी येथे आर्थिक व कामकाज बाबतही शिस्त लागण्याची आवश्‍यकता असल्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मनपा म्हणजे अत्यंत ढेपाळलेले प्रशासन, गैरव्यवहरांचा कळस, आंदोलकांचा धिंगाणा, ठेकेदारांचा धुडगुस, चिरिमिरी कार्यकर्त्यांची लुडबूड व अधिकाऱ्यांना वेठीस धरणे आणि या सगळ्यामध्ये दडपलेले कर्मचारी, शहरात सफाई कामगारांना होणारी मारहाण, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या घरी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच वाढती कामे आणि राजाश्रीत चुकारांचा थाट अशा नकारात्मक बाबींनी गाजणारी मनपा आता कडक शिस्तीमुळे चर्चेत येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सुरूवातीपासूनच कडक धोरण घेतल्याने आता कर्मचारी गणवेशात दिसू लागले आहेत. त्यांच्या गळ्यात ओळखपत्रही दिसत आहे. तर मनपाचा परिसर नेहमी पेक्षा स्वच्छ झाला आहे. विनाकराण लुडबुड करणारांना चांगलाच आळा बसल्याने तोंडात पानाचा किंवा गुटख्याचा तोबरा भरून मनपाच्या भिंती रंगवणाऱ्या छछोर कार्यकर्त्यांची वर्दळही तुलनेत घटली आहे. अधिकारी आपापल्या विभागातील खुर्च्यांमध्ये बसून काम करताना दिसू लागले आहेत. मनपाच्या कार्यालयात राजकीय चमकोगिरी करण्यासाठी आंदोलनांचे जथ्थे घेऊन येणारांना चांगलाच आळा बसला आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच हाकलून दिले जाते हा संदेश गेला आहे. त्यामुळे मनपा म्हणजे राजकीय मान वाढवण्याची जागा नव्हे तर द्विवेदींच्या शिस्तीने आहे तो पण मान गमावण्याचे ठिकाण झाले आहे याची जाणीव तथाकथित नेत्यांना झाली आहे. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या असल्या तरी आंदोलक चिडिचीप आहेत.
एरव्ही असे बदल येथे होणे म्हणजे स्वप्नच होते मात्र ते एका व्यक्तीच्या धोरणाने सत्यात उतरले आहे. परंतु वर्षानुवर्ष ढेपाळलेल्या मनपाला आतून अव्यवस्थेने पोखरलेले आहे. त्यात अधिकाऱ्यांची कमतरताही आहे. विभागनिहाय स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी मिळाल्यास मनपाच्या कार्यक्षमतेत द्विवेदींसारख्यांच्या नेतृत्त्वाने भर पडू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)