शिक्षण लिपीक बदलीत आर्थिक देवाण-घेवाण?

पिंपरी – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील एका लिपिकाच्या बदलीला 25 लाख रुपयांचा भाव फुटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे यांनी केला आहे. चांगले काम करणाऱ्या लिपिकाची आयुक्त ठेकेदारांच्या सांगण्यानुसार बदली करतात. त्यामुळे प्रशासन ठेकेदार चालवत असल्याचे स्पष्ट होत आहे, असाही आरोप महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सुमारे 125 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. या विभागामार्फेत दप्तर, गणवेश, बूट, रेनकोट खरेदी केली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी दिली जात असल्याचे आरोप वारंवार केले जात आहेत. शिक्षण मंडळातील गैरव्यहाराची शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे यांनी माहिती मागविली होती. परंतु, प्रशासन ती माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी बारणे यांनी स्थायी समितीच्या सभागृहासमोर ठिय्या मांडला होता. त्यानंतर त्यांना माहिती मिळाली. परंतु, ती माहिती देखील अपुरी देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण विभागातील लिपिक अविनाश ढमाले यांच्यावर माहिती देऊ नये यासाठी प्रचंड दबाव होता. परंतु, मी उपोषण केल्यानंतर माहिती देण्यात आली. परंतु, त्यानंतर ठेकेदारांनी ढमाले यांना दमबाजी केली. “तु माहिती दिली, तुझी बदली करतो’ आणि तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी दिली. या ठेकेदारांनी त्यांची बदली करुन घेतली. ढमाले यांची सात महिन्यापूर्वीच शिक्षण विभागात बदली झाली होती. परंतु, सात महिन्यामध्ये ठेकेदारांच्या सांगण्यानुसार आयुक्तांनी त्यांची बदली केली. तर, दुसरीकडे शिक्षण विभागात वर्षानुवर्ष काही संस्थानिक ठाण मांडून बसले आहेत. त्यांना हात लावला जात नाही, असाही आरोप बारणे यांनी केला आहे.

या लिपिकाच्या बदलीसाठी 25 लाख रुपयांची देवाण-घेवाण झाली असून यामध्ये आयुक्तांचे हात “ओले’ झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिक्षण विभागाचा पदभार अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे आहे. तर, प्रशासन विभाग देखील त्यांच्याकडेच आहे. लिपिकाचा बदलीचा प्रस्ताव आष्टीकर यांनी त्वरित तयार केला. त्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)