शिक्षणाचा बाजार ! शिक्षण घ्या ! शिक्षण…

शिक्षणाचे व्यवसायिकरण झाले असून त्यात सामान्य वर्ग भरडल्या जातोय. नुकतेच अनेक अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यामध्ये चर्चा आहे ती वाढलेल्या शैक्षणिक शुल्काची. एमबीए, इंजिनियरिंगची फी लाखोंच्या घरात गेली आहे. यात फक्त फायदा होतोय तो शिक्षणाच्या बाजारातील खाजगी दलालांचा, अनेक भक्तांना हे मान्य नसले. तरी हेच वास्तव आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. मात्र याच वाघिणीच्या दुधाची किंमत खूप वाढली आहे. हीच वाघीण आज शिक्षणाचा धंदा करत आहे. ही वाघिणच आहे? की शिक्षणाच्या नावाखाली सामन्यांना लूटणारी धनरागिनी. के.जी. ते पी.जी. यांचे रेट फिक्‍स आहेत. सामन्यांना लुटण्यात हे मात्र हिट आहेत. मारला जातोय तो सामान्य वर्ग.

शेतकरी आत्महत्येची स्मशानभूमी असलेल्या महाराष्ट्रात शेतकरी आपल्या मुलाला शिकवणार कसा. दहावीनंतर सायन्स घ्यायच म्हणून पोरगा आतुर असतो पण शिक्षणाच्या खाजगीकरण पध्दतीमुळे तो मागच पाऊल घेतो. दोन वर्षाची दीड लाख फी एकूण पोराचा बाप ही अर्धमेला होतो आणि पोराला आर्टसला घालतो. अस का? सरकारने ठरवले तर ते शिक्षणाचा बाजार होऊ शकत नाही? सरकारी शिक्षण संस्था सुधारु शकत नाही? खाजगीकरण बंद नाही करू शकत? राजकारण्यांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात. पण करतील कसे कारण डझनभर खाजगी शिक्षणसंस्थाचे मालक तेच असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज ग्रामीण विभागात सुद्धा जागा मिळेल तिथे शिक्षणाचे दुकान थाटले गेले आहे. सरकारने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचे खाजगी दुकाने नक्कीच बंद होतील. तसेच यामध्ये गुणवत्तेवर आधारित शिक्षकांची भरती झाली पाहिजे. 2010 पासून महाराष्ट्र शासनाने सीईटी घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षणाला सामोरे जावे लागते. शासनाने जिल्हा परिषद शाळेवरच्या शिक्षकांचा अतिरिक्त भार कमी करायला हवा. शिक्षकांना विनाकारण अतिरिक्त भार लावल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. जर शिक्षण संस्थांवरील संस्था चालकांची मुजोरी मोडीत काढली तर नक्कीच महाविद्यालयीन व पदवीच्या विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळेल. यावर्षीच्या ऑल इंडिया हायर एज्युकेशन सर्व्हेनुसार, देशातील 77.8 टक्के महाविद्यालये खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत. यावरून उच्च शिक्षणावर खासगी पकड किती पक्की झाली आहे, हे स्पष्ट होते.

आज कॉलेज फक्त नावापुरत मर्यादित आहे. शिकवणी वर्ग नसतात, पाहिजे त्या सुविधा नसतात, बेरोज़गारीमुळे जो तो खाजगी क्‍लासचा धंदा उघडून बसलाय. अशावेळी विद्यापीठाने कॉलेजची मान्यता काढून घ्यायला पहिजे. कारण कॉलेज फक्त प्रवेशासाठी उपलब्ध असतात. बाकी सगळ खाजगी क्‍लासच्या भरवशावर. आज महाराष्ट्रात शिक्षण हाच सर्वात मोठा धंदा झालाय. काही ठिकाणी तर क्रेडिट कोर्स नावाखाली विद्यार्थ्यांची सर्रास लूट होते. विद्यार्थ्यांना घडवायच म्हणून नाही तर फॅशन म्हणून लोकांनी धंदे चालू केले. पैसा सर्व काही नाही म्हणून गाजावाजा करायचा आणि शिक्षणाच्या बाजारात शिक्षणाचाच भाव वाढवायचा. आज चार वर्ष झाली मुख्यमंत्री बोलून की, खाजगी शिक्षण पद्धतीवर निर्बंध लावण्यात येतील पण अजून काही बाजार थांबला नाही. गुणवत्ता न पाहता फक्त पैसा पाहून शिक्षकांना नोकरी मिळते. स्वतःला शिक्षणसम्राट म्हणायचे आणि लुटारुची कामे करायची. देशाचा मंत्री जर गुणवत्तेवर होत नसतील तर शिक्षणसम्राट काय करतील. त्यामुळे गरज आहे समान दर्जाची संधी देत भरमसाठ वाढलेल्या फी वर शासनाने नियंत्रण आणण्याची.

आज शिक्षणाची जाहिरातबाजी, पोस्टरबाजी पाहता तो दिवस दूर नाही. हे खाजगी दलाल उद्या बाजारात बसून म्हणतील कोणी शिक्षण घेत का रे..! शिक्षण आणि खरच आजच्या शिक्षणसम्राटांना लाज वाटेल, असे कार्य करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आठवण येते. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करण्यापासून मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले. अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावले. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. भाऊरावांचे कार्य पाहून आजच्या शिक्षण संस्थाना लुटारु म्हणणे अयोग्य ठरणार नाही. एकीकडे आज शिक्षणाच्या महाग दुकानात मुलाच्या शिक्षणासाठी दागिने विकणारी आई तर दुसरीकडे वसतिगृह चालवण्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकणाऱ्या भाऊराव पाटलांच्या पत्नी! लाजच मेलेल्या शिक्षणसम्राटांना कधी कळणार हे!

– संदीप कापडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)