शिक्षणमंत्री महोदय, शिक्षक भरती घोषणेचे 6 महिने संपले!

– व्यंकटेश भोळा

पुणे – राज्यात गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. तर, “राज्यात येत्या सहा महिन्यांत 24 हजार शिक्षकांची भरती करू,’ अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी फेब्रुवारीत मोठ्या दिमाखात केली होती. त्यासाठी “पवित्र’ पोर्टलही कार्यान्वित केले. परंतु प्रत्यक्षात शिक्षक भरती अजूनही सुरू झाली नाही. त्यामुळे राज्यात शिक्षक भरतीचा प्रश्‍न रखडला असून, नव्याने शिक्षक भरती कधी होणार, असा प्रश्‍न शिक्षणक्षेत्रातून होत आहे. विशेष म्हणजे, खुद्द शिक्षणमंत्र्यांनी दिलेली 6 महिन्यांची मुदतही संपली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षक भरतीच्या प्रश्‍नावर विरोधकांनी गेल्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरले होते. “हा प्रश्‍न ऐरणीवर असताना सरकार केवळ पोकळ आश्‍वासने देऊन पदवी आणि पदव्युत्तर उमेदवारांची विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे. 24 हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणेची अजूनही अंमजबजावणीही सुरू झालेली नाही. शिक्षक भरतीसाठी पूर्वपरीक्षा केव्हाच झाली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून आर्थिक कारण पुढे करून ही प्रक्रिया रेंगाळत ठेवली जाते,’ असा आरोप शिक्षक आमदारांनी केला आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे इच्छाशक्‍ती असेल आणि आपल्या घोषणेप्रती ते प्रामाणिक असतील, तर 24 हजार शिक्षकांच्या भरतीसाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही. मात्र, शिक्षक भरतीची घोषणही होऊन सात महिने उलटले, तरही शिक्षण विभागच ढिम्मच आहे. स्वत:च्या घोषणेची आपल्या विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याचे शिक्षण मंत्र्यांच्या निर्दशनास येत नाही का? ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत? अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.

सध्या डी.एड., बी.एड. उमेदवारांपुढे मोठा प्रश्‍न उभा आहे. आयुष्यातील उमेदीचे दिवस वाया जात आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही मुलगा शिक्षक झाला, तर घराचे भले होईल, या आशेने अनेक पालकांनी मुलांना शिकवले. मात्र तेही नैराश्‍याने ग्रासले आहेत. याउलट शिक्षक होण्यासाठी डी.एड. उत्तीर्णाची परीक्षा, टीईटी आणि त्यानंतर अभियोग्यता चाचणी या परीक्षेतून विद्यार्थ्याला गुणवत्तेची कसोटी सिद्ध करावी लागत आहे. शिक्षक भरतीही बंद आहे. अशा परिस्थितीत आपण शिक्षक होऊ शकतो? असा आर्त सवाल उमेदवारांतून होत आहे.

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा दर्जा ढासळत चालला आहे, हे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या “असर’ अहवालातून वेळोवेळी स्पष्ट होत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात महाराष्ट्राला शिक्षणात वरच्या स्थानावर नेण्याचा संकल्प आहे. अशा स्थितीत शिक्षणाचा महत्त्वाचे अंग असलेला शिक्षकच पुरेसे नसतील, तर शिक्षणाचा पाया भक्‍कम कसे होणार. त्यामुळे शिक्षक भरतीची सुरूवात येत्या निवडणुकांपूर्वी होईल का? हेच आता पाहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)