शिक्षक शासनाची वेठबिगारी करतोय

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

लोणी काळभोर- शासन व शिक्षण संस्था यांच्यात सुप्त संघर्ष पेटला आहे. शिक्षण संस्थांच्या अधिकारावर सरकार गुलामी लादत असून शिक्षकांच्या डोक्‍यावर शैक्षणिक कामाऐवजी प्रशासकिय व तांत्रिक कामाचे ओझे वाढविण्यात समाधान मानत आहे. त्यामुळे ताठ मानेचा शिक्षक हा शिक्षकी पेशाचा स्वाभिमान गमावून शासनाची वेठबिगारी करतो आहे. खिचडी शिजवून वाटप करण्यापासून जनगणना व निवडणुकीची कामे करण्यामुळे शिक्षक हैराण झाला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कवडीपाट येथील मधूबन मंगल कार्यालयांत डॉ. बापूजी साळुंखे विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन डॉ. सबनीस बोलत होते. संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, विद्यासमिती सचिव अरूण सुळगेकर, परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, कार्यवाहक प्रकाश पायगुडे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्राचार्य डॉ. सुनिलकुमार कुरणे, प्राचार्य एस. एम. गवळी, मुख्याध्यापिका सरोज पाटील आदी मान्यवरांसमवेत संस्थेच्या विविध हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सबनीस म्हणाले की समाजाच्या उत्थानासाठी प्रखर तपश्‍चर्येतून सिद्ध झालेला ध्येयवाद हवा. त्यासाठी त्याग व तत्वनिष्ठा महत्वाची ठरते. म्हणून तर सत्याचे संशोधन व ज्ञानाची उपासना करणा-या गुरुदेव शिक्षकांची फौज बापूजी साळुंखे यांनी दूरदृष्टी ठेवून उभी केली.

सदर संमेलनापुर्वी सकाळी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांची प्रकट मुलाखत झाली. त्यानंतर दुपारी कथाकथन कार्यक्रमात व कविसंमेलनात लेखक रविंद्र कोकरे, कवि हनुमंत चांदगुडे, राजेंद्र सोनवणे यांनी विविध विषयावंर प्रकाशझोत टाकला. सुत्रसंचालन कल्पना बोरकर व सतीश कुमदाळे यांनी केले. प्राचार्य अरूण सुळगेकर यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. सुनिलकुमार कुरणे, सिताराम गवळी, मुख्याध्यापिका सरोज पाटील यांच्यासह लोणी काळभोर विद्यासंकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.