शिक्षक बदलीप्रकरण अधिकाऱ्यांना भोवणार

10 जणांवर कायदेशीर कारवाई करण्याचे ‘एसीबी’चे पालिकेला पत्र

पुणे- महापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी लाच मागिल्याप्रकरणी तत्कालिन शिक्षण मंडळाचे अधिकारी तसेच कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. या 10 जणांवर एसीबीच्या चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांवर महापालिका प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र पालिका प्रशासनास नुकतेच पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, “एसीबी’कडून हे पत्र प्राप्त झाले असून त्यावर कोणताही प्रशासकीय निर्णय झाला नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. या बदल्यांसाठी लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने 18 जून 2015 रोजी कारवाई केली होती. त्यात शिक्षण मंडळाच्या तत्कालीन आजी-माजी अध्यक्षांसह एका लिपिकेला पैसे स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले होते.

“एसीबी’ने केलेल्या कारवाईनंतर याप्रकरणी “एसीबी’ने चौकशी अहवाल नुकताच महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शिक्षण मंडळांच्या तीन माजी शिक्षण प्रमुखांसह उपशिक्षण अधिकारी आणि महापालिकेच्या एका अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह तब्बल दहा जण हे चौकशीत दोषी आढळले आहेत.

काय आहे अहवालात?
आंतरजिल्हा बदल्याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसा गैरव्यवहार केला, हे या अहवालात आहे. विशेष म्हणजे, “एसीबी’ने 18 जूनला कारवाई केल्यानंतर यतील दोषींना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसे प्रयत्न केले, खोटी माहिती आणि कागदपत्रे तयार करून एसबीचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात महापालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हात गुंतले आहेत. तेही या प्रकरणात दोषी आहेत. या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची दाट शक्‍यताही “एसीबी’ने व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)