शिक्षक घेताहेत “वंदे गुजरात’ वाहिनीवरून प्रशिक्षण

शिक्षकांनी घेतले जिओ सिम : राज्यातील शिक्षक नाराज

पुणे – राज्यात यंदा नव्याने येऊ घातलेल्या इयत्ता पहिली तसेच आठवीच्या अभ्यासक्रमाबाबत सध्या राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण वंदे गुजरात या गुजराथी वाहिनीवरून देण्यात येत आहे. तसेच ज्या शिक्षकांना ही वाहिनी डीटीएचच्या माध्यमातून दिसत नाही, अशांना जिओ सिमच्या माध्यमातून हे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळेच मराठी वाहिन्या सोडून गुजराथी वाहिन्यांवरून प्रशिक्षण कशासाठी, याबाबत आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ज्या-ज्या वेळी एखादा अभ्यासक्रम नव्याने येतो, त्या वर्षी राज्यातील संबंधित इयत्तांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. राज्यात यंदा इयत्ता पहिली व इयत्ता आठवीची नवी पुस्तके बाजारात आली आहे. त्यामुळेच या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांवर परिषदेने प्रशिक्षण आयोजित करणे अपेक्षित होते.

मात्र, यासाठी दरवेळी सर्व शिक्षा अभियानाकडून निधी मंजूर होत असे. या योजनेचे नामकरण समग्र शिक्षा अभियान झाल्यानंतर यंदा हा निधी आलाच नसल्याचे परिषदेतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच हे प्रशिक्षण रखडले होते. त्यातच प्रशिक्षण नाही झाले तर, विद्यार्थ्यांना शिकवावे कसे असा प्रश्‍न राज्यातील शिक्षक विचारत होते. म्हणून त्यावर परिषदेने डीटीएचच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे ठरविले. त्यानुसार 24, 25 व 26 सप्टेंबर दरम्यान राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुख्य म्हणजे यासाठी गुजराथी वाहिनी व जिओ अॅपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण ऐकायचे असल्याने शिक्षकांकडून याबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. मराठी वाहिन्या असतानाही गुजराथी वाहिनीवरून प्रशिक्षण का, या एकतर्फी प्रशिक्षणाचा खरोखरच उपयोग होईल का, आम्ही आमच्या शंका कधी व कोणाला विचारायच्या, असे अनेक प्रश्‍न सध्या राज्यातील शिक्षक विचारत आहे. तर, हे प्रशिक्षण गुजराथी वाहिनीमधून देण्यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे.

जिओ सीम कशासाठी?
राज्यात अशा अनेक शाळा आहेत. जिथे अद्यापही डिटीएचची सुविधा उपलब्ध नाही. अशा शाळांमधील शिक्षकांनी जिओ सिम घेत त्यातील अॅप डाऊनलोड करत प्रशिक्षणाचे व्हिडिओ पहावेत, असे त्यांना सांगण्यात आले आहे. परंतु, हे व्हिडिओ विद्या परिषदेच्या यु-ट्युब चॅनेवरून प्रसारित करता येऊ शकले असते. यासाठी जिओ सिम कशासाठी, असा प्रश्‍नही राज्यातील शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)