‘शिक्षकी पेशातील समाधान’

आजकाल आपण पाहातो की, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो कामाच्या ठिकाणी आपण आपली कामे व्यवस्थित करत असतो. पण कुटुंबासारखे जिव्हाळ्याचे वातावरण सर्व ठिकाणी पाहायला मिळेतच असे नाही. शिक्षकी पेशात अनुभवास आलेला काळ सतत एक विद्यार्थी म्हणूनच जाणीव देत राहतो. मग काम करताना आपण सर्वजणी एकच आहोत अशी भावना सर्वाची असते. शाळेतील त्या रम्य दिवसांची साक्ष ठरलेले अनेक अनुभव डोळ्यासमारून तरळून जात होते.

शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका एक विनम्र शांत स्वभावाचे, सर्वांना सांभाळून घेणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याकडून नकळत खूप शिकता आले. त्यांना साथ देणाऱ्या उपमुख्याध्यापिका एक आदर्शच होत्या. त्यांच्या नुसत्या साध्या बोलण्यातून-संवादातून खूप काही शिकत गेले. सर्वांना सांभाळून घेत पुढे जाण्याचा त्यांचा नेतृत्वगुण निश्‍चितच दाखवण्याजोगा होता. संपूर्ण शाळेची जबाबदारी लीलया सांभाळणाऱ्या, शाळेत कौटुंबिक जबाबदारी-जिव्हाळा जोपासणाऱ्या कुटुंबातील माझ्या साऱ्या मैत्रिणी तेवढ्याच महत्वाच्या, प्रिय. जणू काही शाळा एक कुटुंबच अशा पद्धतीने सर्वजणी सतत हसतमुखाने राहतात. आपापसातील सुसंवादामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडून येत असतात सतत संवादामुळे नकळत प्रत्येकीच्या स्वभावाचे विविध पैलू बघायला मिळाले व त्यातून शिकताही आले.

अगदी रोज चहा देणाऱ्या मावशीपासून ते सर्व सहशिक्षिकांपर्यत मला आदर आहे. प्रत्येकीच्या स्वभावाचे विविध पैलू मी अनुभवले. साध्या स्वभावाच्या सर्व मैत्रिणीचे मोलाचे सहकार्य लाभले. आपण आपल्या घरातच वावरत आहोत हे सतत भासत रहाते. शिक्षिका म्हणून सर्वांच्या स्वभावातून मी खूप शिकले. शाळेतील सहकार्य, कुठेही बघायला न मिळणारी ती ओढ, ते वातावरण शिक्षिकेला अनुभवता येते. जीवन खूप सुंदर आहे, कारण या जीवनात माणसाला करता येण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. हसावे आणि हसवावे, जगावे आणि जगवावे, शिकावे आणि शिकवावे, प्रेमं द्यावं प्रेम घ्यावं, आनंद द्यावा अनं घ्यावा पुढे चालाव पुढे पुढेच चालत राहवं अशी एक सुंदर मैफिलचं होती शाळेची, विद्यार्थी कायम मनात स्मरणात राहणारे त्या सर्वांची मी ऋणी आहे. विद्यार्थ्यामुळे शिक्षकी पेशाला शोभा. इतर पेशांपेक्षा कमी पैसा मिळणारे, पण अधिक समाधान देणारे कार्यक्षेत्र असाच शिक्षकीपेशाचा उल्लेख करावासा वाटतो. आपल्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेत हाताखालून गेलेले शेकडो विद्यार्थी जेव्हा विविध क्षेत्रात नामांकित होतात, त्यावेळेस शिक्षकांना अपार समाधान मिळते. त्याची तुलना अन्य कोणत्याही भौतिक सुखाशी होऊ शकत नाही.

गुरु शिष्याची परंपरा जपणारी ही ज्ञानदानाची शिदोरी वाटण्याची मला नकळत संधी मिळत आहे. मग एक विद्यार्थी म्हणून सतत शिकण्याची उमेद जागवत राहते, ती या ज्ञानदानाच्या शिक्षकी पेशातून एका विद्यार्थ्या प्रमाणेच एकाच ध्येयाने बांधून ठेवणारी ती शाळेची इमारत मनाच्या कुठल्यातरी अबोध कप्प्यांत चिरंतन आठवणी जागृत ठेवत राहते. शिक्षक विद्यार्थ्यांची भेट आपुलकी जिव्हाळा नकळत जागृत करत राहते.

शिक्षकांनाही आत्मपरीक्षण करायला लावतील असे हे अनुभव समृध्द करून जातात. नैतिक बंधन मुलांना घडवण्याचे शिक्षकी पेशातून साध्य करताना स्वत:ला सतत अपडेट ठेवणेही किती गरजेचे आहे, हे विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरुन बघितले तर कळते. एक नागरिक म्हणून कामावर निष्ठा हवीच, पण एक शिक्षक म्हणून ह्याची सतत जाणीव अधिकच असायला हवी हे कळते. सुशिक्षित, सुसंकृतपणाचे माध्यम शिक्षण ह्यातून माणूस घडवणारे शिक्षण याचा एक सेवक म्हणून शिक्षकी पेक्षा, त्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी या शिक्षिकी पेशाने मिळाली, या गोड मैफिलीसोबत असणाऱ्या सर्वाची कृतज्ञता व्यक्त करताना वाटत राहते. जीवन सुंदर आहे. हसण्यासाठी, हसत खेळत, मिळून काम करण्यासाठी, आनंदासाठी-आनंद घेण्यासाठी व देण्यासाठी या मिळून साऱ्याजणी, हेच समाधान शिक्षकी पेशातील आयुष्याच्या अंतापर्यत सतत कृतज्ञतेची जाणीव जपणारे अतूट भावबंध स्नेह जपणारे दोन मने जोडणारे संस्काराची फुले फुलवणारे अन्‌ नकळत जबाबदारीची जाणीव टिकवणारे एक शाश्‍वत शिक्षकी पेशातील समाधान.

– मधुरा धायगुडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.