शिक्रापूर पोलिसांचे चाललेय तरी काय?

चोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी ः चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ

शिक्रापूर- येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून होणाऱ्या वाहन चोऱ्या व घरफोड्या यांना नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. अनेक चोऱ्यांचे प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असताना देखील शिक्रापूर पोलिसांना चोरांना पकडण्यात अद्याप यश आलेले नसल्यामुळे शिक्रापूर पोलिसांचे चाललेय तरी काय? असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहन चोरांनी दहशत माजविली असून अनेक दिवसांपासून घरफोड्या व दुकानांच्या चोऱ्यांनी देखील उच्चांक गाठला आहे. अनेकदा चोरी करताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत; मात्र सीसीटीव्हीमधील चोरांनी देखील त्यांना पकडण्याचे पोलिसांना आव्हान दिलेले आहे. त्यामुळे चोरांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरलेले आहेत. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मागील वर्षी एका वर्षात झालेल्या चोऱ्यांचा आकडा यावर्षी वर्ष संपण्यासाठी चार महिने कमी असतानाच पूर्ण झाला असल्यामुळे चोऱ्यांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे; मात्र शिक्रापूरसारख्या मोठ्या पोलीस ठाण्यात आठ अधिकारी व साठ पोलीस कर्मचारी आणि पंधरा होमगार्ड असा कर्मचारी वर्ग असताना चोऱ्यांच्या प्रकारावर अंकुश ठेवणे पोलिसांपुढे जिकरीचे झाले आहे.

विशेष म्हणजे होणाऱ्या चोऱ्या शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे या भागातील जास्त असून या भागांमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी आणि पोलीस अधिकारी नेमलेले आहेत. तरी देखील चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. अनेकदा चोऱ्या होऊनदेखील पोलीस चोरांचा शोध घेत नाहीत आणि घेतला तर आपल्याला आपल्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळत नाहीत, असा नागरिकांचा समज होत असल्यामुळे नागरिक देखील तक्रार देत नाहीत. कित्येकदा दिवसाढवळ्या चोऱ्या झालेल्या आहेत. पोलीस हे तडजोडीच्या गुन्ह्यांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप अनेक गावचे नागरिक करीत आहेत.

 • शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील चोऱ्यांची संख्या
  वर्ष, एकूण चोऱ्या, वाहन चोऱ्या, उघड गेन्हे
  2017, 192, 109, 54
  2018, 138, 80, 16
  2019 125, 72, 15
 • शिक्रापूर पोलीस स्टेशन कर्मचारी संख्या
  पोलीस निरीक्षक 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 2, पोलीस उपनिरीक्षक 5, सहाय्यक पोलीस निरीक्षक 9, पोलीस हवालदार 15, पोलीस नाईक 13 तर पोलीस शिपाई व महिला पोलीस 25 आणि यांसह 15 होमगार्ड असा पोलीस कर्मचारी वर्ग शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे.
 • शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये गस्त घालण्यासाठी आरएफआयड चे पाठक नेमण्यात आलेले असून, त्यानुसार पोलीस कर्मचारी गस्त घालत असतात. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण कमी झालेले आहे.
  -सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक शिक्रापूर
 • दबंग अधिकाऱ्यांची आठवण
  शिक्रापूर पोलीस ठाण्यात यापूर्वी असलेले पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी चोरांच्या टोळ्या, बनावट नोटांच्या टोळ्या, वाहनचोरांच्या टोळ्या, चंदन चोरांच्या टोळ्या पकडून जनतेमध्ये विश्वासाहर्ता निर्माण केली होती. त्यानंतर रमेश गलांडे यांनी काही प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण रोखले होते. संतोष गिरीगोसावी यांचा अनेकांनी धसका घेतला होता; परंतु काही दिवसांतच त्यांची बदली झाली त्यामुळे अशा दबंग अधिकाऱ्यांची आठवण होत आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×