शिक्रापूरच्या परिसरात गारांचा खच

एक तास दमदार पाऊस : उकाड्याने हैराण नागरिक चिंब

शिक्रापूर- शिक्रापूरसह परिसरातील अनेक गावांमध्ये सायंकाळी वळीव पावसाने गारांसह दमदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसामुळे सुखावले आहेत. पावसानंतर हवेत कमालीचा उकाडा जाणवत होता. यावेळी रस्त्यावर गारांचा खच पडला होता.

शिक्रापूरसह परिसरातील तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, जातेगाव, पिंपळे जगताप, करंदी यांसह आदी भागामध्ये सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात गारा सुद्धा पडल्या. त्यामुळे रस्त्यावर गारांचा खच पडला होता. पावसाबरोबर जोरदार वारे वाहू लागले. त्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. फ्लेक्‍स कोसळण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी विद्युतप्रवाह खंडित झाला. एक तास मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शिक्रापूर पाबळ चौक, चाकण चौक यांसह आदी भागामध्ये रस्त्यावर तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणीच पाणी झाले होते. अनेक दिवसापासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. या दमदार पावसामुळे नागरिक व शेतकरी सुखावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.