शिक्रापुरातील वेळ नदी मरणासन्न

भूमिगत गटारींमधून सांडपाणी मिसळले : नदीकाठ परिसरातील शेती धोक्‍यात

शिक्रापूर– शिक्रापूर (ता. शिरूर) येथून वाहणाऱ्या वेळ नदीमध्ये येथील स्थानिक नागरिक व रहिवाशांनी भूमिगत गटारींमधून सांडपाणी व मैलापाणी सोडलेले आहे. या गटारमुळे आज वेळ नदीची दयनीय अवस्था झाली आहे. नदीला अक्षरशः गटारगंगा व कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण आहे.
वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकीकरणामुळे शिक्रापूर तसेच तळेगाव ढमढेरे व परिसरामध्ये लोकसंख्या अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांनी मोठमोठ्या इमारती उभारल्या आहेत. खोल्या भाड्याने देण्याचे व्यवसाय थाटल्या आहेत. परंतु त्या इमारतींमध्ये सांडपाण्याचे नियोजन नसल्यामुळे अनेकांनी इमारतींचे सांडपाणी भूमिगत गटारलाईनच्या माध्यमातून नदीमध्ये सोडून दिले आहेत. नदीमध्ये सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याचे डबके तयार झालेले आहे. त्या पाण्याचा परिणाम परिसरातील विहिरींना होत आहे. नागरिक व शेतकऱ्यांच्या विहिरींचे तसेच विंधनविहिरींचे पाणी देखील दूषित होत आहे. या समस्येला अजून भर म्हणजे शिक्रापूर येथील आठवडे बाजारात गोळा होणारा ओला व सुका कचरा तसेच खराब झालेला भाजीपाला नदीमध्ये आणून टाकला जातो. शिक्रापूर परिसरातून दररोज गोळा होणारा कचरा गाड्यांद्वारे येथील नदीच्या कडेला आणून टाकला जातो. तेथेच पेटवून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे प्रदुषणात भर पडत आहे.
दररोज सायंकाळच्या सुमारास राजरोसपणे कचरा जाळला जात असल्यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले जात आहेत. त्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत असतो. वेळ नदीमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पाण्याच्या साचलेल्या त्या डबक्‍यांमुळे नदीने हिरवा रंग धारण केलेला आहे. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. शिक्रापूर येथील वेळ नदीमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नदी किनारी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कचऱ्याचे योग्य नियोजन करून नदी किनारी गोळा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • पर्यावरण संतुलनासाठी ग्रामपंचायत अपयशी
    राज्य शासनाकडून नद्यांचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असतात. तरी देखील शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने चक्‍क नदीपात्रामध्ये गटार तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकार सर्रास व खुलेआम सुरू आहे. नदीच्या पर्यावरण संतुलनासाठी ग्रामपंचायत अपयशी असल्याचे दिसून येत आहे. येथील परिसरात औद्योगिकीकरणाचा वेग प्रचंड असल्यामुळे सदनिका थाटल्या आहेत. अतिक्रमण करून काही सदनिका उभ्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र्य यंत्रणा नसल्यामुळे नदीकाठ परिसरातील ग्रामपंचायतींचे पर्यावरणाला तिलांजली देण्याचा प्रकार सुरू आहे.
  • शेती व नागरिकांवर पाण्याचा परिणाम
    वेळ नदी ही शिक्रापूरसह शेजारील मुखई, जातेगाव, तळेगाव ढमढेरे गावांतून वाहत असल्यामुळे परिसरातील नदीकाठच्या शेकडो हेक्‍टर शेतीवर या पाण्याचा परिणाम होत आहे. शिक्रापूर, तळेगाव भागात नदीच्या कडेला असलेल्या जमिनीमध्ये काही सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. त्या सोसायट्यांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी देखील विकत घेऊन प्यावे लागत आहे. येथील नदीकाठावरील शेती धोक्‍यात आली आहे. शेतीला पाणी देण्यालायक हे पाणी नाही. त्यामुळे शेतीचे उत्पादन घटले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)