शाही विवाहाची कहाणी

ब्रिटनचे युवराज हॅरी आणि अमेरिकी अभिनेत्री मेगन मार्केल यांचा शाही विवाहसोहळा संपूर्ण जगाचे आकर्षणकेंद्र ठरला. या विवाहसोहळ्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत किती भर टाकली? या प्रश्‍नापासून या सोहळ्यात कोणकोणत्या शाही रूढी-परंपरांना फाटा देण्यात आला, इथपर्यंत अनेक प्रश्‍न जगभर चर्चिले गेले. या शाही विवाहसोहळ्यातील लक्षवेधी ठरलेल्या काही बाबींचा घेतलेला वेध…

ब्रिटनचे युवराज हॅरी आणि अमेरिकेतील अभिनेत्री मेगन मार्केल विवाहबंधनात अडकले. हॉलीवूडचे ग्लॅमर आणि शाही शिष्टाचार या दोन्हींच्या संगमामुळे हे लग्न थाटामाटात होणे स्वाभाविकच आहे. हॅरी हे महाराणी एलिझाबेथ यांचे नातू आहेत तर मेगन मार्केल ही अमेरिकेतील टीव्ही स्टार. त्यामुळे उभयतांचे लग्न ब्रिटनच्या विंडसर कॅसलमध्ये खूपच धूमधडाक्‍यात झाले. विंडसर कॅसल हा ब्रिटनच्या शाही घराण्याचा महाल एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. याच महालात रंगलेल्या या शाही सोहळ्याचा खर्च 3.2 कोटी पौंड म्हणजेच 312 कोटी रुपये इतका झाला, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे या शाही विवाहसोहळ्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.

विवाहसोहळ्यातील रंगतदार बाबींची चर्चा जगभर झाली. या सोहळ्यासाठी जगभरातील एक हजार पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, शाही विवाह सोहळ्यात जगभरातील चाळीस राजे आले होते. परंतु लग्नाच्या वेळी चर्चच्या आत जगातील दहा निवडक राजेच होते. हॅरी यांचे पिता प्रिन्स चार्ल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नाला एकूण 2640 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यातील 1200 जण इंग्लंडमधील सर्वसामान्य नागरिक होते. विविध संस्था, संघटनांशी संबंधित 200 लोक लग्नाला उपस्थित होते. दोन स्थानिक शाळांचे शंभर विद्यार्थीही लग्नाला आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विंडसर कॅसल आणि सेंट जॉर्ज चॅपल समुदायातील 610 लोक तसेच शाही घराण्याशी संबंधित असलेले 530 लोक लग्नाला आले होते. मेगन मार्केल ही हॉलिवूडची आणि अमेरिकी टीव्ही शोमधील स्टार असली, तरी ती लेखिका आणि निर्मातीही आहे. या दोघांचे लग्न कशामुळे जमले, हे कोणी ठामपणे सांगू शकत नसले, तरी हॅरी आणि मेगन दोघेही प्राणीप्रेमी आहेत. ही बाब दोघांच्याही सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टपणे लक्षात येण्याजोगी आहे. शाही घराण्यातील राजकुमार हॅरी यांची मेगन मार्केलसोबत दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती.

त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. राजकुमार हॅरी यांनी पहिल्याच भेटीत जिला पसंत केले, अशी ही मेगन आहे तरी कोण, असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. त्यातही आश्‍चर्याची बाब म्हणजे मेगन ही हॅरी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. मेगनचा जन्म 1981 मध्ये झाला. तिची आई समाजसेविका आणि योगशिक्षिका आहे तर वडील पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक आहेत. 1992 मध्ये झालेल्या दंगलीबाबत आणि त्यातही पोलिसांच्या क्रौर्याबाबत मेगनने रोखठोक भूमिका घेतली होती.

विंडसर कॅसलमध्ये शाही विवाहसोहळ्यात हॅरी आणि मेगनने एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि ते दोघे पती-पत्नी झाले. 19 मे रोजी ब्रिटनच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता विवाहसोहळा सुरू झाला. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अनेक शाही परंपरांच्या ऐवजी नवे प्रयोग यावेळी करण्यात आले. उदाहरणार्थ, सप्ताहाचा मध्य गाठून लग्न करण्याऐवजी ते शनिवारी करण्यात आले. 2011 मध्ये जेव्हा राजपुत्र विल्यम्सचे लग्न झाले होते तेव्हा त्यांच्या पोशाखाचा खर्च होता 4.34 लाख डॉलर म्हणजे सुमारे 3.67 कोटी रुपये. मार्केलच्या पोशाखाचा खर्च मात्र तिने स्वतःच केला.

लग्नातील संगीत, सजावट, रिसेप्शन, निमंत्रण आणि अन्य खर्च मात्र शाही घराण्यानेच केले. पर्यटन, रिटेल, फॅशन आणि खास शाही उत्पादनांची विक्री यासंदर्भात हे लग्न खूपच महत्त्वपूर्ण ठरले. या लग्नामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 50 कोटी पौंड म्हणजे तब्बल 45 अब्ज रुपये एवढी भर पडली. भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही मेगनची मैत्रिण असून, तिच्या लग्नात तिने इतर मैत्रिणींसह खूप दंगामस्ती केली. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने सर्व मैत्रिणींचा एक फोटोही शेअर केला. त्याचबरोबर लग्नाच्या आधीची धम्माल ती सातत्याने शब्दबद्ध करून सोशल मीडियावर शेअर करत होती.

लग्नाच्या आदल्या रात्री 12.10 वाजता वधूच्या पोशाखाची प्रतीक्षा सर्व मैत्रिणी करीत होत्या, तसेच धमाल मस्ती करीत होत्या, हेही तिने शेअर केले. ब्रिटनमध्ये पोहोचण्याच्या काही क्षण आधीच तिने म्हटले होते की, सूर्याच्या किरणांनी ब्रिटनमध्ये माझे प्रथम स्वागत केले. या शाही विवाहसोहळ्यात सिल्व्हर बर्च आणि इंग्लिश ओक या झाडांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला. या झाडांवर बीच, हॉर्नबीम या झाडांच्या फांद्या लावून व्हाईट गार्डन रोजेस, पियोनीज आणि फॉक्‍सग्लोव्हज या फुलांची सजावट करण्यात आली होती. वधू मार्केलच्या हाती जो पुष्पगुच्छ होता, त्यात शाही रिवाजानुसार मिर्टेक फुलाची एक फांदी समाविष्ट होती. आपल्या लग्नात भाषण करणारी शाही परिवारातील मार्केल ही पहिलीच वधू ठरली.

ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्यांत फ्रूटकेकची परंपरा आहे. प्रिन्स विल्यम आणि केट मिडिलटन यांनी आपल्या लग्नात आठमजली पारंपरिक फ्रूट केक तयार करविला होता. हा केक तयार करण्याची जबाबदारी पेस्ट्री शेफ क्‍लेअर टॅक यांच्यावर सोपविण्यात आली होती. वसंत ऋतूत हा केक आपल्या स्वादाने वातावरण बदलून टाकतो. त्यावर बटरक्रीमचे आइसिंग केलेले होते आणि हा केक ताज्या फुलांनी सजविण्यात आला होता. हा केक दिसायला खूपच आकर्षक दिसत होता. परंतु मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या लग्नातील केक शाही परंपरांनुसार नव्हता. त्याचप्रमाणे मेगनचे पिता प्रकृती अस्वास्थ्यामुळे या लग्नात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रिन्स हॅरी यांचे वडील प्रिन्स चार्ल्स हेच वधू मेगनला घेऊन विवाहस्थळी आले.

प्रिन्स विल्यम हे प्रिन्स हॅरी यांचे “बेस्ट मॅन’ बनले. शाही विवाह सोहळ्यानंतर भाषण देण्याची पद्धत नाही. परंतु मेगन ही अशा प्रकारे लग्नानंतर भाषण देणारी या खानदानातील पहिली वधू ठरली. सामान्यतः पारंपरिक रूढींनुसार वर, वधूचे वडील आणि वराचा बेस्ट मॅन एवढे जणच लग्नानंतर भाषण करतात. परंतु मेगनचे वडील अनुपस्थित असल्या- मुळे शाही परंपरा मोडून मेगनने स्वतःच भाषण दिले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी परंपरा सांभाळत; परंतु बऱ्याच ठिकाणी परंपरा मोडत झालेला हा शाही विवाहसोहळा संपूर्ण जगाचे आकर्षणकेंद्र ठरला.

वैभवी पोतदार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)