शास्ती’च्या अभय योजनेला हिरवा कंदील

 

पिंपरी – थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम 15 ऑक्‍टोबरपर्यंत एक रकमी भरणाऱ्या मिळकतधारकांना शास्ती रकमेच्या 90 टक्के तर 16 ते 31 ऑक्‍टोबर अखेर भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना 75 टक्के सवलत देण्याच्या अभय योजनेस स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामांच्या 34 कोटी 26 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. महापालिकेच्या भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेसाठी नविन रिंग मेन पाईप लाईन टाकण्यासाठी 56 लाख 13 हजार रुपये, काळेवाडी, रहाटणी भागातील पवना नदीच्या कडेने मुख्य गुरुत्व वाहिनीच्या कामासाठी 42 लाख 78 हजार रुपये, नवी सांगवी मुख्य जलनि:सारण नलिकामध्ये सुधारणा करण्यासाठी 49 लाख 73 हजार रुपये, संगणक संच साहित्य खरेदी करण्यासाठी 25 लाख 48 हजार रुपये, बीआरटी कॉरीडॉर क्र.3 वर सुदर्शन नगर चौक येथे ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी 25 कोटी 73 लाख 56 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व बालवाड्यांच्या भिंती 3 डी पेंटिंग करण्याबरोबरच बालदिनानिमित्त सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदान व भोसरी गावजत्रा मैदानात बालजत्रेचे आयोजन करण्याबरोबरच महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, बॉक्‍सिंग स्पर्धा व हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यास स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या सर्व विभागांना उपयुक्त अशी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील हवाई छायाचित्रे पुणे महापालिका प्रादेश विकास प्राधिकरणाकडून खरेदी करण्यासाठी महापालिका 53 लाख 93 हजार रुपये मोजणार आहे. या खर्चास मान्यता देण्यात आली.

महसुलात 19 कोटींची भर
महापालिकेच्या वतीने गतवर्षी शास्ती कर भरण्यासाठी दिलेल्या अभय योजनेला मिळकतधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी अभय योजनेतून एकूण 19 कोटी 14 लाख महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. याचा 10 हजार 970 मिळकतधारकांनी लाभ घेतला, अशी माहिती स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)