शास्तीकर लादणाऱ्या राष्ट्रवादीला मतं मागण्याचा काय अधिकार-आढळराव पाटील

भोसरी-शास्तीकर लादण्याचे पाप करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकांच्या भावनांशी खेळ केला होता. शास्तीकर लादणारी ही मंडळी निवडणुका आल्या की तो रद्द करण्याची आश्‍वासने द्यायचे अशा लोकांना मतं मागण्याचा अधिकार आहे का? अनेकांनी दागदागिने विकून, मेहनत करुन मिळवलेली कमाई खर्ची घालून गुंठा-अर्धागुंठा जागा घेतली आणि स्वतःचे घर बांधले. त्यांच्या बांधकामावर शास्तीकर नावाचा जिझिया कर लादण्याचे पाप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले. मात्र युती शासनाने शास्तीकर रद्द करुन या कष्टकरी-कामगार वर्गाला न्याय दिला आहे. हा कर रद्द व्हावा यासाठी मी स्वतः सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार महेशदादा लांडगे यांनीही प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शास्तीकर लादणाऱ्यांनी आम्ही काय केले, असे विचारु नये अशा शब्दात शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले.

आपल्या निवडणूक प्रचारासाठी खासदार आढळराव पाटील आज भोसरी येथे आले असताना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. भोसरीचा रेडझोनचा प्रश्‍नाचे काय झाले? असा प्रश्‍न विरोधक मला विचारतात. पण मी त्यांना विचारतो की, केंद्रात दहा आणि राज्यात पंधरा वर्षे तुमच्या पक्षाची सत्ता होती. देशाचे संरक्षणमंत्रीपद तुमच्याकडे होते. मग त्यावेळी का नाही तुम्ही हा प्रश्‍न सोडवला? मी गेली 10 वर्षे रेडझोनचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. यूपीए सरकारच्या काळात त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळेच तर मला लोकसभेच्या पिटीशन कमिटीकडे दाद मागावी लागली. पण तरीही या मंडळींनी दाद दिली नाही. 2014 मध्ये पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आल्यावर मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री झाले. मी त्यांची भेट घेऊन हा प्रश्‍न त्यांना समजावून सांगितला, पत्रव्यवहारही केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रेडझोन भागाचा दौराही केला. त्यांच्या सूचनांनुसार रेडझोनची हद्द कमी करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. परंतु दुर्देवाने त्यांना राजकीय परिस्थितीमुळे पुन्हा गोव्यात जावे लागले आणि हा प्रश्‍न सुटता सुटता राहिला. पण या प्रश्‍नाचा माझा बराच अभ्यास झाला आहे. त्यामुळे मीच हा प्रश्‍न सोडविणार आहे असे खासदार आढळराव पाटील म्हणाले.

आज दिवसभरात खासदार आढळराव पाटील यांनी रूपीनगर, ओटास्कीम, निगडी गावठाण, यमुनानगर, अजेंठानगर, त्रिवेणीनगर, कुदळवाडी, जाधववाडी, सेक्‍टर नं. 16, बालाजीनगर, गवळीमाथा, यशवंतनगर, विठ्ठलनगर, नेहरूनगर, उद्यमनगर, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, स्पाईनरोड, संतनगर, इंद्रायणीनगर, गुळवेवस्ती, धावडेवस्ती, सदगुरूनगर, लांडगेनगर, महादेवनगर, चक्रपाणी वसाहत, पोस्टऑफिस रोड, जयमहाराष्ट्र चौक, शास्त्री चौक, श्रीकृष्ण मंदिर, दिघीरोड, खंडोबामाळ, आपटे कॉलनी, विकास कॉलनी आणि लांडेवाडी येथे नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या प्रचार दौऱ्यात आमदार महेशदादा लांडगे, नगरसेवक रवि लांडगे, महिला संघटिका सुलभा उबाळे, विजय फुगे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, निलेश मुटके, संगिता पवार, आशा भालेकर, सुखदेव नरळे आदी सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.