शासन निर्णयामुळे उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न धुळीस

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा वयोमर्यादेच्या काठावरील उमेदवारांना फटका
व्यंकटेश भोळा
पुणे –
करोना पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचा फटका जे उमेदवार वयोमर्यादेच्या काठावर आहेत, त्यांना बसणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अशा उमेदवारांना आयोगाच्या पुढच्या परीक्षेसाठी संधी देण्याची मागणी होत आहे.

करोनाचे संकट लक्षात घेत राज्य शासनाने “एमपीएससी’च्या सर्व परीक्षा लांबणीवर टाकल्या. परीक्षेची अंतिम तयारी टप्प्यात आली असताना आणि उमेदवारांनी परीक्षेची सर्व तयारी केली असतानाच अचानकपणे राज्य सरकारने घेतलेला निर्णयाचा उमेदवारांना मोठा धक्‍का बसला आहे. तर काही उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत केले. कोणतीच मागणी अथवा चर्चा नसताना राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. जे उमेदवार पाच-सहा वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत, त्यांपुढे मोठा प्रश्‍न पडला आहे. या निर्णयाने काही उमेदवार नैराश्‍याच्या गर्तेत जाणार असल्याची भीती व्यक्‍त होत आहे.

“एमपीएससी’ची 20 सप्टेंबर रोजी परीक्षा होत आहे. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्या सर्व उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयानंतर अन्य परीक्षाही लांबणीवर पडणार आहेत. अशा कालावधीत काही उमेदवारांची वयोमर्यादा संपणार आहे. अशांना आयोगाच्या पुढच्या परीक्षेस बसता येणार नाही. त्यामुळे वयोमर्यादा वाढवून मिळावी, ही मागणी होत आहे. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात वयोमर्यादेच्या काठावर असलेल्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये, यासाठी उमेदवारांना परीक्षेत वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी
परीक्षा पुढे गेल्याने हजारो उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी वयोमर्यादा संपल्याने मिळणार नाही. याबाबत कुठलेही स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलेले नाही. राज्य सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय दुर्दैवी असून, वयोमर्यादेबाबत तातडीने खुलासा होणे आवश्‍यक असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांचे म्हणणे आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आता आयोगाच्या सर्व परीक्षा लांबणीवर पडणार हे स्पष्टच आहेत. अशा परिस्थितीत काही उमेदवारांची परीक्षेसाठी वयोमर्यादा संपेल. त्या उमेदवारांना पुढची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादेत शिथिलता आणणे आवश्‍यक आहे. त्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
– महेश बडे आणि किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट राईटस्‌

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.