शाश्‍वत विकासासाठीच मी कटिबद्ध -डॉ. कोल्हे

लेण्याद्री-भावनेचे राजकारण करणारे परिसराचा कधीच विकास करत नाहीत, अशा शब्दांत खासदार शिवाजीराव आढळराव यांना टोला लगावताना कोणाला काय टीका करायची करूद्या, मी मतदारसंघाच्या शाश्‍वत विकासासाठीच कटिबद्ध आहे, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.
डॉ. कोल्हे यांनी जुन्नर तालुक्‍यातील गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी गोळेगावमधील कोपरा सभेत बोलत होते. यावेळी अतुल बेनके, सत्यशील शेरकर, संजय काळे, गणपत फुलवडे, पांडुरंग पवार, बाळासाहेब खिलारी, अंकुश आमले, उज्ज्वला शेवाळे, अर्चना भुजबळ, शंकरराव ताम्हाणे आदी उपस्थित होते. डॉ. कोल्हे म्हणाले, पाच वर्षांत या सरकारने पाणी हे पिण्यासाठी, शेतीसाठी, माणसांसाठी ठेवले नाही तर पाण्याचा वापर केवळ राजकारण करण्यासाठी केला. आता भावनेचं राजकारण केले जात आहे. कारण पंधरा वर्षांत कामे केली नाहीत, त्यामुळे ही वेळ ओढवली आहे. आता काय एका शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी दहा-दहा मंत्री प्रचाराला बोलवत आहेत.

शंकरराव ताम्हाणे म्हणाले, भरमसाठ आश्‍वासने दिली; परंतु एकही पूर्ण केले नाही. असा हा माणूस विकासावर एकही शब्द बोलायला तयार नाही. आपल्यातील सर्व गटतट विसरुन डॉ. कोल्हे यांच्या मागे उभे राहून 100 टक्‍के पाठींबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. आलमे येथे डॉ. कोल्हे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी परिवर्तनाचा निर्धार केला आणि पिंपळगाव जोगा धरण ते आलमे जलवाहिनीची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच परशुराम गोपाळे, आदिवासी नेते रायबा घोगरे (ठाकूर समाज संघटना), विठ्ठल खुटले, सोमनाथ गोपाळे, श्रीधर येंदे उपस्थित होते. बल्लाळवाडी येथे ग्रामस्थांनी डॉ. कोल्हे यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी सुमीत डोंगरे या जवानाच्या हस्ते डॉ. अमोल कोल्हे यांचा सन्मान करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.