शालेय विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी “गुरु’

श्रध्दा कोळेकर

अर्थाजनासाठी स्पर्धा परीक्षार्थींमध्ये “होम ट्यूशन’चा नवा ट्रेंड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे  – गावाकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यासारख्या शहरात यायचे.. पण येथे आल्यावर लक्षात येते की अभ्यासिका, राहण्यासाठी रुम, मेससाठीचा महिन्याकाठचा खर्च हा दहा हजारांवर जातो.. मग सुरू होते जॉबसाठीची परवड. पण तिथेही आठ तास किंवा चार तास घालवणे अवघड. यावर नामी शक्‍कल लढवत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी घरी जावून शिकवणी घेण्याचा (होम ट्यूशन) नवा ट्रेंड उदयाला आला आहे.

पुणं शहर हे विद्येसोबतच स्पर्धा परीक्षांचे माहेरघर वाटावे इतपत विद्यार्थी येथे परीक्षांचा अभ्यास करत आहेत. यातील बरीचशी मुलं ही पुण्या-मुंबईसारख्या शहरांपासून दूर ग्रामीण भागांतून आलेली आहेत. यातील बरीचशी मुले ही गरीब घरातून सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन आली आहेत. मात्र दिवसेंदिवस पुण्यासारख्या शहरात स्पर्धा परीक्षांचा चांगलाच बाजार भरला आहे. स्पर्धा परीक्षेशी निगडित प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग झाले आहे. मग ती कॉट बेसिसवर मिळणारी रुम असो, अभ्यासिका असो, स्पर्धा परीक्षेचा क्‍लास असो किंवा नाश्‍त्याच्या गाड्या वा मेस असो प्रत्येक गोष्ट महाग झालेली पहायला मिळत आहे. एका विद्यार्थ्यांचा महिन्याकाठचा कमीत कमी खर्च दहा हजारांवर जातो. अशावेळी शेतीवाडी करणाऱ्या पालकांकडून महिन्याकाळी दहा हजार रुपये मागणे विद्यार्थ्यांना अवघड वाटते. अशा या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही वॉचमन, सायबर कॅफेत नोकरी असे अनेक पर्याय शोधले आहेत; मात्र कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसा मिळवून देणारा घरी जावून शिकवणी घेण्याचा (होम ट्यूशन) नवा जॉबच जणू त्यांना मिळाला आहे.
सध्या शहरातील अनेक मुलं हे उच्च मध्यमवर्गीय घरातील मुलांना एक तास शिकवण्यासाठी जातात. त्याचे त्यांना महिन्याकाळी सात ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतात. याशिवाय रविवार व मुलांच्या सुट्टीच्या दिवशी सुट्टी हा भाग वेगळाच. वेळ, पैसा आणि ज्ञान या सर्वच दृष्टीकोनातून हा जॉब सोयीचा असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

घरच्यांना पैसे मागायची लाज वाटते..
अशाच प्रकारे ट्यूशन देणाऱ्या विद्यार्थ्यांने दैनिक “प्रभात’शी नाव न सांगण्याच्या अटीवर संवाद साधला.. तो म्हणाला, स्पर्धा परीक्षांची स्पर्धा किती वाढली हे वेगळे सांगयला नको. त्यातच दुसरीकडे वय वाढते आहे. घरच्यांकडून लग्न करण्याचा आग्रह केला जातो. “तू काही अधिकारी होणार नाही, आपली शेती कर’ असा सल्ला वारंवार दिला जातो. गावाकडे गेलो की लोक अजून अभ्यासच चालू आहे का, असे टोमणे मारतात. त्यातच घरची परिस्थिती पाहून घरी पैसे मागण्याची इच्छाही होत नाही. अशावेळी इथेच जॉब बघून जेवणापाण्याचे व अभ्यासिकेचा खर्च निघेल असे काम करतो आहे. त्यात मला मिळालेला हा पर्याय बरा वाटतो आहे. या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवताना आपलेही इंग्रजी सुधारते व ज्ञानातही भर पडते. विद्यार्थ्यांच्या घरी रोज जाण्यासाठी एक हजार खर्च वगळता यात फारसा तोटाही नाही. त्यामुळे किमान माझा 80 टक्‍के खर्च यातून निघतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)