शांत, प्रेमळ आणि तेजस्वी माझे गुरु (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

||गुरू:मध्ये स्थिता माता
  मातृमध्ये स्थितो गुरू
  गुरू:माता नमस्तेस्तू
  मातृगुरु: नमाम्य हम ||

‘गुरू’ या संकल्पनेबद्दल प्रत्येकाच्या विचारधारा निरनिराळ्या असू शकतात. तसा विचार करता मातृ म्हणजे आई जीला आजवर आपण पहिला गुरू असे संबोधत आलो. जी आपल्याला या जगात आणते आणि नुसताच श्वास नाही तर जगण्याचे संस्कारही तीच देते. मात्र त्या मोबदल्यात तिची काहीही अपेक्षा नसते अगदी हेच निखळ नातं आई-मुलांचं, त्याच मातृ रुपात मी माझ्या गुरूंना पाहत आले. !! माझ्या गुरूमाउलींनी त्यांच्या कृपाछत्राखाली घेऊन माझ्या जगण्याचा योग्य मार्ग त्याच दिवशी निश्चित केला, ज्या दिवशी मला त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करण्याचं महत भाग्य लाभलं!!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तो दिवस आहे 2 नोव्हेंबर 2009 सालातला, ज्या दिवशी माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला आणि जीवनाला एकप्रकारचे स्थिरत्व आलं! माझे गुरू श्री अशोकबाबा कुलकर्णी यांचे बऱ्याच वर्षांपासून पुणे पद्मावती येथे वास्तव्य आहे. तशी त्यांची ओळख मोजक्या शब्दात करणं अशक्यच पण सांगायचं झालं तर अनेक महान हस्ती ज्यांच्यापुढे नेहमीच नतमस्तक होतात असे माझे गुरू. ज्यांना सगळे ‘बाबा’ असे संबोधतात. त्यांनी स्वतः माझ्या घरी येऊन मला आणि माझ्या यजमानांना अनुग्रहित केले यापेक्षा थोर भाग्य ते काय !!!

बाबा हे माझ्या मावशीच्या नात्यातले असल्याने त्यांना मी लहानपणापासून पाहत आले. एक शांत, प्रेमळ आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाचे आजोबा म्हणून नेहमीच मला त्यांच्याबद्दल आदर असायचा पण काही वर्षानंतर जसे मला कळू लागल तसे त्यांच्याबद्दल उत्सुकता वाढायला लागली. त्यांचे बरेचसे शिष्य माझ्या नात्यात असल्याने बाबांच्या श्रेष्ठत्वाबद्दल खूप काही ऐकायला मिळायचं, श्री श्री माँ आनंदमयी यांचे शिष्यत्व पत्करून माताजींच्याच इच्छेनुसार त्यांनी भागवत कथन करण्यातच आजवरच उभं आयुष्य सत्कारणी लावले, त्यांच्या मुखातून भागवत कथा ऐकताना हजारो लोक त्यात तल्लीन होऊन जातात. काही जणांना तर त्यावेळी प्रत्यक्ष स्वतःच्या गुरूंचे, देवतेचे, राधा कृष्णाचे तसेच गोपिकांचेही दर्शन झाल्याचे पाहिले आहे. त्यांचे भागवत ऐकताना कृष्णकथा जशीच्या तशी प्रत्यक्षात डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.

प्रत्येकाच्या जीवनात गुरू हा जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा गुरूंचा सहवास !! मी खरच खूप भाग्यवान आहे की मला आयुष्याच्या पूर्वार्धातच बाबांसारखे पूर्णज्ञानी गुरू लाभले केवळ एका हाकेसरशी त्यांनी आम्हा दोघांना त्याच्या कृपाछत्राखाली सामावून घेतले. वेगवेगळ्या अध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा नित्य सहवास लाभला, त्यामुळे माझ्या जीवनाला योग्य दिशा प्राप्त झाली आहे हे मात्र खात्रीशीर !! त्यामुळं भविष्यात कुठल्याही प्रकारच्या चिंतेला माझ्या आयुष्यात स्थान नाही. ज्यांच्यामुळे हे सर्व व्यक्त करण्याचं भाग्य मला लाभलं त्या माझ्या गुरुबाबांना माझ त्रिवार वंदन !!

– मुग्धा गोरक्ष पेंडसे, खोपोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)