शहिदांना लोकसहभागातून मदत

महाळुंगे इंगळे ग्रामस्थांचा पुढाकार : एक लाखाचा निधी सुर्पूर्द

आंबेठाण- देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या पंक्‍तीप्रमाणे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना संपूर्ण देश मदत करीत असताना महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावातील नागरिकदेखील मागे राहिले नाही. अगदी दहा रुपयांपासून दहा हजारापर्यंत आर्थिक मदत करीत गावकऱ्यांनी शहीदांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चिमुकल्या मुलांपासून ते उद्योजक अन्‌ राजकीय व्यक्‍ती यांचाही यात समावेश आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 41 जवान शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने श्रीक्षेत्र महाळुंगे या आध्यात्मिक नगरितील युवक,व्यापारी बांधव व ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन गावातून फेरी काढून मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी स्वखुशीने मदत निधी दिला.

हा मदत निधी बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवान स्व. नितीन शिवाजी राठोड व स्व. संजयसिंह भिकमसिंह राजपुत यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी जाऊन ग्रामस्थांनी दिला आहे. यात प्रत्येकी 50हजार रूपये याप्रमाणे दोन्ही कुटुंबीयांना मिळून एक लाख रुपये देण्यात आले आहेत. श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व गायकवाड परिवार यांनी यात्रेचा खर्च टाळून या मदत निधीला सहाय्य केले तर युवा कार्यकर्ते राहुल पवार व ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेंद्र भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे व माजी उपसरपंच किरण शिवळे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील यासाठी आर्थिक मदत केली आहे. गावातील कार्यकर्त्यांनी शिवजयंतीला येणारा खर्च टाळून या उपक्रमास हातभार लावला आहे.

आम्हा दोन्ही कुटुंबीयांना केलेल्या मदतीने निश्‍चितच आमच्या मुलांच्या शिक्षणाला व कुटुंबाला हातभार लागणार असल्याचे मत शहीद जवानांच्या वीर पत्नींनी व्यक्‍त केले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती महाळुंगे ग्रामस्थ व युवकांचा देशसेवेसाठी एक हात मदतीचा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.