शहर स्वच्छतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा घेतला वर्ग
नगर – प्रत्येक शहराची चांगली किंवा वाईट प्रतिमा निर्माण करण्याचे काम हे त्या शहरातील स्वच्छता साफसफाई करणारे कर्मचारी करत असतात. त्यामुळे हे कर्मचारी खऱ्या अर्थाने शहराचे स्वच्छता सैनिक आहेत. महापालिकेतील 80 टक्‍के स्वच्छता कर्मचारी चांगले काम करतात. मात्र, 20 टक्‍के कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे ही प्रतिमा खराब झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे सांगत जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज द्विवेदी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्याबरोबरच त्यांना शिस्तीचे खडे बोलही सुनावले. यापुढे महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामांबाबत नागरिकांकडून प्रतिसाद मागवला जाईल. ज्याठिकाणच्या प्रभागात स्वच्छतेच्या कामांविषयी नागरिकांची नाराजी असेल, तक्रारी असतील, तेथील कर्मचारी, सुपरवायझर, स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी संबंधितांना बजावले.
स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. मात्र, त्याबरोबरच शासकीय गणवेशात नसलेल्या, ओळखपत्र न लावलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले. कामे मनापासून न केल्यामुळे शहराची रया गेली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. ही परिस्थिती शहरासाठी भूषणावह नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या प्रभागातील स्वच्छता मनापासून आणि प्रामाणिकपणे करणे अपेक्षित आहे. असे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.
प्रत्येक प्रभागातील कर्मचाऱ्यांची त्यांनी व्यक्तीश: संवाद साधला. काम कोठे करता, कामाचे स्वरुप काय, दररोज कामावर येता काय… कामांत काय अडचणी येतात यावर त्यांनी या स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलते केले आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम महत्वाचे आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनीही त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याचे आदेश दिले. शहरातील उद्यानांची अवस्थाही फारशी चांगली नाही. ही उद्याने स्वच्छ आणि सुंदर झाली पाहिजेत, त्यासाठी आवश्‍यक पावले उचला. तेथे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी तेथील परिसराची नियमित स्वच्छता करणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, उद्यान अधीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
गणवेश अन्‌ ओळखपत्र आवश्‍यक
यापुढे कर्मचारी गणवेशात तसेच शासकीय ओळखपत्राशिवाय आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.कामांबाबत विचारणा केल्यावर खोटी माहिती देऊ नका. जी वस्तुस्थिती आहे, तीच मांडा, जेणेकरुन आपल्याला सुधारणा करता येतील. मात्र, माहिती चुकीची दिल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)