शहरी गरीब योजनेसाठी तातडीनं निधी द्यावा 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका आयुक्तांना पत्र

पुणे :  महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा निधी संपल्याने या योजनेतील अनेक रूग्णालयांकडून गरीब रूग्णांना उपचार नाकारण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकांना उपचारापासून मुकावे लागत असून या योजनेसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी नगरसेवक उदय महाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक शहराध्यक्ष महेश हांडे, राजू साने यावेळी उपस्थित होते.
या योजनेसाठी करण्यात आलेली तरतूद संपल्याने रूग्णालयांची कोटयावधीची बिले थकली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना रूग्णालये उपचार देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव पदरमोड करून उपचार घ्यावे लागत आहेत. परिणामी रूग्णांची गैरसोय होत असल्याने तातडीनं या योजनेसाठी वर्गीकरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या शिवाय, गेल्या दोन वर्षापासून डॉ. होमी बाबा हॉस्पिटलचा पुनर्विकास करण्यात येत आहे. मात्र, त्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही.त्यामुळे शिवाजीनगर भागातील वडारवाडी , गोखलेनगर ह्या भागातील रुग्णास जवळ हॉस्पिटल नसल्याने ससून रूग्णालयात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे तातडीनं या रूग्णालयाचे कामही पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या बाबत प्रशासनाने तातडीनं कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हांडे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.