‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे प्रलंबित प्रश्नांचा आढावा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा तिप्पट शास्तीकर, रखडलेला पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आणि महापालिका हद्दीवरील पश्‍चिमेकडील गावे महापालिकेत समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी “व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे सोमवारी (दि. 4) पिंपरी-चिंचवड शहरातील राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्वांचा आढावा घेणार आहेत.

सोमवारी (दि. 4) दुपारी चार वाजता प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील व्हिडीओ कॉन्फरसिंगमधून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्‌घाटनासाठी शहरात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकराचा प्रश्न येत्या पंधरा दिवसांत मार्गी लावला जाईल. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लागण्याबाबत मी स्वतः लक्ष घातले असल्याचे सांगत मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून, त्यांच्या समस्या मार्गी लावून जलवाहिनीचा प्रश्न सामंजस्याने सोडविणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर परदेशी हे सोमवारी प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेणार आहेत.

बंदिस्त जलवाहिनी, अवैध बांधकामावर आकारण्यात आलेला शास्तीकर याची माहिती परदेशी घेणार आहेत. तसेच गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे, सांगवडे ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहे. तसेच महापालिकेचा आकृतीबंध, अत्यावश्‍यक आणि आवश्‍यक असलेली सरळ सेवेतील रिक्त पदे भरणे, महापालिका विकास योजनेतील प्रस्तावाने बाधीत क्षेत्राचा मोबदाला अदा करणे, एच. ए. च्या ताब्यातील अतिरिक्त 59 एकर जमीन बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित करण्याबाबत चर्चा करणार आहेत.

महसूल विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, पुनावळे येथील राखीव घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठीची राखीव जागा, संरक्षण विभागाच्या जागा, महसूल आणि वनविभागाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरणाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये तळवडे, दिघी, मोशी, चिखली येथील जागाबाबत चर्चा केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत. त्यामध्ये ताथवडे, नियोजित मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठीची आरक्षित जागा, थेरगाव व ताथवडे येथील 45 मीटर रस्त्याची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)