व्यापाऱ्यांचा “भारत बंद’ यशस्वी

किरकोळ क्षेत्रांत परकीय गुंतावणुकीस विरोध : निर्णय मागे घेण्याची मागणी

पुणे – किरकोळ क्षेत्रांत परकीय कंपन्यांना गुंतवणूक करण्यास 100 टक्के परवानगी दिल्याच्या विरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, दिल्लीने (कॅट) पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनानुसार पुण्यात व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आम्ही पण मतदार आहोत’ “रिटेल एफडीआई भगाओ… अपने वतन को बचाओ’… अशा आशयाचे फलक घेऊन शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी रॅली काढत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने सकाळी अकरा वाजता सारस बागेतील गणपतीची आरती करून सारसबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

रिटेलमधील परकीय गुंतवणुकीमुळे वॉलमार्ट, अलीबाबा, फ्लिपकार्ट या कंपन्या रिटेल व्यवसायात येत आहेत. संबंधित कंपन्या कायद्याला बगल देऊन देशात शिरकाव करीत आहेत. या कंपन्या धर्मादाय करण्यासाठी नाही तर पैसे कमाविण्यासाठी भारतात येत आहेत. त्यांचे ध्येय कमी दराचे आमिष दाखवून स्पर्धा नष्ट करून ते स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याचे आहे. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था या परकीय साम्राज्यवाद्यांच्या गुलामगिरीत अडकू नये म्हणून हा बंद पुकारण्यात आला होता. कॅटच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये शहरातील पुना मर्चंटस्‌ चेंबर, हमाल पंचायत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री, पुणे जिल्हा किरकोळ व्यापारी संघ, जीतो, पुणे जॅगेरी मर्चंट्‌स असो., राष्ट्रवादी व्यापारी सेल, पुणे व्यापारी मंडळ, ऑल इंडिया केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, पुणे स्टेशनरी अॅन्ड कटलरी असोसिएशन, पुणे होलसेल जनरल मर्चंटस्‌ असोसिएशन यासह पुणे व्यापारी महासंघ आणि त्यांच्या संलग्न विविध व्यापारी संस्थांनी पाठिंबा दिला होता. याविषयी कॅटचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक अजित सेटीया म्हणाले, शुक्रवारी पुकारलेला बंद संपूर्ण राज्य आणि देशात यशस्वी झाला आहे. सरकारच्या धोरणाबाबत सध्या सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. हा लढा सुरूच राहणार आहे.

मार्केटयार्डातील गुळ-भुसार बाजारात कडकडीत बंद
दि पुना मर्चंट्‌स चेंबरनेही या बंदला पाठींबा दिला होता. त्यामुळ मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागात बंद पाळण्यात आला. दोन्ही विभागात मिळून जवळपास 650 गाळे आहेत. त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तेल, कडधान्ये गूळ आदी खाद्यपदार्थांचा व्यापार करण्यात येतो. ही सर्व दुकाने बंद ठेवली होती. व्यापारी देशाच्या आर्थिक नाडिशी जोडलेला एक नागरिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था परकियांच्या हातात जाऊ नये, यासाठी भारत बंद पुकारण्यात आल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आल्या. तर, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, सरकारने किरकोळ क्षेत्रात परकीय कंपन्यांना 100 टक्के गुंतवणूक करण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा व्यापारी तीव्र आंदोलन छेडतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)