व्यभिचाऱ्याला ठेचण्याची शिक्षा!

नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असणारा ब्रुनेई हा देश मुस्लिमबहुल आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया या आपल्या शेजारी देशांच्या तुलनेत इस्लामचे पालन अधिक कडकपणे करणारा देश म्हणून ब्रुनेई ओळखला जातो. समलैंगिक संबंधांना या देशात पूर्वीपासूनच गुन्ह्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. परंतु या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आतापर्यंत नव्हती. हा कायदा फक्त मुसलमानांनाच लागू होतो. तेथील राजाने पुढील बुधवारपासून म्हणजे तीन एप्रिलपासून कठोर दंडसंहिता लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चोरी करणाऱ्यांसाठी हात-पाय तोडण्याची शिक्षा आता निश्‍चित करण्यात आली आहे. पहिल्यांदा चोरी करणाऱ्याचा उजवा हात तोडला जाईल, तर दुसऱ्यांदा चोरी केल्यास डावा पाय तोडला जाईल.

मानवाधिकार संघटनांनी ब्रुनेईतील या निर्णयावर कठोर टीका केली आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनल संघटनेने नवे कायदे तातडीने अंमलात न आणण्याची विनंती केली आहे. या संघटनेचे ब्रुनेई विषयातील अभ्यासक राहेल शोहोआ-होवर्ड यांनी सांगितले की, अशा क्रूर आणि अमानवी शिक्षा कायदेशीर करणे भयावह आहे. काही गुन्हे तर असे आहेत की, जे गुन्ह्यांच्या श्रेणीतच ठेवणे चुकीचे आहे. यात समलैंगिक व्यक्तींमध्ये सहमतीने झालेल्या शरीरसंबंधांचा समावेश आहे. नव्या दंडसंहितेसंबंधीची नोटीस ब्रुनेईच्या ऍटर्नी जनरल्स चेंबर्सने 29 डिसेंबर 2018 रोजीच जारी केली होती. नोटिशीत असे म्हटले होते की, नवी दंडसंहिता तीन एप्रिल 2019 पासून लागू केली जाईल. ह्यूमन राइट्‌स कमिशनचे फिल रॉबर्टसन यांनी असा इशारा दिला आहे की, नवा कायदा परदेशी गुंतवणूकदार, पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देश सोडून जाण्यास भाग पाडणारा ठरेल. रॉबर्टसन असेही म्हणतात की, हा चुकीचा कार्यक्रम पुढे रेटला, तर ब्रुनेईवर आंतरराष्ट्रीय बहिष्काराचे आंदोलन पुन्हा सुरू होऊ शकेल. यापूर्वी 2015 मध्येसुद्धा ब्रुनेईने कडक कायदे स्वीकारून ख्रिसमसच्या आयोजनावर बंदी घातली होती. अशा आयोजनांमुळे मुस्लिम भ्रष्ट होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली गेली होती.

ब्रुनेईचे राजे हनसल बोलकिया यांच्याविषयी आतापर्यंत अनेक विवाद उत्पन्न झाले आहेत. त्यांचे भाऊ जेफरी यांच्याशी त्यांचे झालेले भांडण बरेच गाजले होते. 1990 च्या दशकात जेफरी देशाचे अर्थमंत्री होते आणि त्यांच्यावर 15 अब्ज डॉलरची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यायालयीन खटल्यादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेफरी बिगरइस्लामी जीवनशैली अनुभवतात. सुखविलासात मग्न असतात. विदेशी वंशाच्या महिलांशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यांचा सर्वाधिक वेळ यॉट, विमानप्रवास आणि विलासात व्यतीत होतो. अशा देशात होत असलेल्या ताज्या बदलांची जगाने नोंद घेतली असून, नवा कायदा लागू झाल्यास ब्रुनेईला जगभरातून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागणार आहे.

– अभय कुलकर्णी, मस्कत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.