वोटर स्लिप वाटपासाठी धावपळ

शंभर टक्‍केचे आव्हान कायम : भोसरीत 86.84 तर चिंचवडमध्ये 54.13 टक्के वाटप पूर्ण

पिंपरी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये फोटो वोटर स्लिपचे आजअखेर सर्वाधिक 86.84 टक्के इतके वाटप झाले आहे. तर सर्वांत कमी वाटप चिंचवड विधानसभा मतदारसंघात केवळ 54.13 टक्‍के झाले आहे. पिंपरी मतदारसंघात 82 टक्‍क्‍यांपर्यंत वाटप पूर्ण झाले आहे. स्लिपांचे शंभर टक्के वाटप पूर्ण करण्याचे आव्हान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसमोर कायम राहणार आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिलेले असताना शंभर टक्‍के वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ होणार आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना वाटप करण्यात येणाऱ्या फोटो वोटर स्लिपचे वाटप शंभर टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये सद्य:स्थितीत भोसरी मतदारसंघाने आघाडी घेतली आहे. त्या पाठोपाठ पिंपरी मतदारसंघात वाटप झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांना फोटो वोटर स्लिप मिळाल्या नव्हत्या. विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांना या स्लिपा मिळाव्या, यासाठी निवडणूक यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. भोसरी मतदारसंघात 4 लाख 41 हजार 125 मतदार आहेत. त्यापैकी 3 लाख 83 हजार 79 स्लिपांचे वाटप पूर्ण झाले आहे. म्हणजे सुमारे 86.62 टक्के इतके वाटप झाले आहे. पिंपरी मतदारसंघात 3 लाख 53 हजार 545 मतदार आहेत.

त्यापैकी 2 लाख 89 हजार 907 मतदारांना स्लिप वितरित केल्या आहेत. टक्केवारीत हे प्रमाण 82 टक्के इतके आहे. चिंचवड मतदारसंघात 5 लाख 18 हजार 309 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 80 हजार 402 मतदारांना स्लिप वितरित केल्या आहेत. टक्केवारीतील प्रमाण 54.13 टक्के इतके आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस उरलेले असताना चिंचवड मतदार संघ स्लिप वाटपाबाबत खूपच मागे राहिला असल्याने शंभर टक्‍के वाटप होण्याची शक्‍यता कमी आहे.

मतदारांची होणार धावाधाव – 
मतदानासाठी आता फोटो वोटर स्लिप पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे ही स्लिप नसली तरी मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्र किंवा अन्य 11 पुरावे सादर करून मतदान करता येणार आहे. संबंधित वोटर स्लिपमुळे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राबाबत सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे मतदान करणे सोयीस्कर होते. त्यामुळे ज्यांना या स्लिपा मिळणार नाहीत त्यांना शनिवारी (दि. 19) घराजवळील मतदान केंद्रातून या स्लिप घ्याव्या लागणार आहेत. तर, काही ठिकाणी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत या स्लिपा घरपोच दिल्या जाणार आहेत. ज्यांच्याकडे स्लिप नसतील त्यांना स्वत: मतदान केंद्राची माहिती मिळवावी लागणार आहे. त्यामुळे मतदारांची धावपळ उडणार आहे.

पिंपरीत मदत कक्ष – 
पिंपरी विधानसभा मतदार संघातंर्गत शनिवारी (दि.19) 399 मतदान केंद्रांवर मतदार मदतकक्षाची सोय केली आहे. संबंधित कक्षाचे काम सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या वेळेत चालेल. मतदारांच्या शंकांचे निराकरण, शिल्लक मतदार चिठ्ठ्यांचे वाटप, मतदानाबाबत मार्गदर्शन व आवश्‍यक ती सर्व माहिती पुरविण्याचे कामकाज संबंधित कक्षामार्फत केले जाणार आहे. तरी, सर्व मतदारांनी संबंधित कक्षातून आपल्या नावाची मतदार चिठ्ठी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भोसरीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत शिल्लक राहिलेल्या मतदार चिठ्ठ्यांचे घरपोच वाटप केले जाणार आहे. मतदार यादीतील नाव ुुु.लशे.ारहरीरीहीींर.र्सीें.ळप किंवा र्पीीं.िळप या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.