वॉटसनची खेळी अविश्‍वसनीय…

केन विल्यमसनची कबुली 
मुंबई – अंतिम सामन्याआधी जेमतेम पाच दिवसांपूर्वी झालेल्या क्‍वालिफायर-1 सामन्यात सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ज संघाला जवळजवळ पराभूत केले होते. परंतु फाफ डु प्लेसिसच्या अफलातून खेळीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादवर निसटता विजय मिळविताना अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळेच याच दोन संघांमध्ये रंगणारा आयपीएलच्या अकराव्या मोसमातील अंतिम सामना तितकाच चुरशीचा होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेन वॉटसनच्या बहारदार खेळीमुळे चेन्नईने हैदराबादचा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद संपादन केले.
वॉटसनने केवळ 57 चेंडूंत नाबाद 117 धावा फटकावून चेन्नईला एकहाती विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि तब्बल आठ षटकारांचा समावेश होता. तसेच वॉटसनचे या मोसमातील हे दुसरे शतक ठरले.

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननेही चेन्नईच्या विजयाचे श्रेय वॉटसनला देताना त्याच्या खेळीची तोंड भरून प्रशंसा केली.य वॉटसनची खेळी संस्मरणीय आणि तितकीच अविश्‍वसनीय होती, असे सांगून विल्यमसन म्हणाला की, अंतिम सामन्यात वेगवान शतक झळकावणाऱ्या कोणत्याही फलंदाजाचे योगदान मान्यच केले पाहिजे. अंतिम सामन्यात वॉटसनला रोखणे अशक्‍यच जाले होते, असे सांगून विल्यमसन म्हणाला की, पहिल्यांदा फलंदाजी करताना आम्हीही चांगली कामगिरी केली होती. तसेच चेन्नईच्या गोलंदाजांनीही प्रभावी मारा करताना आम्हाला मर्यादित धावसंख्येत रोखले होते. तरीही आमची धावसंख्या विजयासाठी पुरेशी असल्याची आमची भावना होती. इतकेच नव्हे तर चेन्नई संघाची सुरुवातीला 5 षटकांत 1 बाद 20 अशी अवस्था होती, तोपर्यंत सामना समसमान स्थितीत होता. परंतु वॉटसनच्या खेळीमुळे सारीच गणिते बदलून गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चेन्नई संघातील अनुभवी खेळाडू हाच दोन संघांमधील खरा फरक ठरल्याचे सांगून विल्यमसन म्हणाला की, एका क्षणापर्यंत कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकणारा सामना चेन्नईने ज्या प्रकारे आपल्या बाजूला फिरविला ते आश्‍चर्यकारक होते. परंतु चेन्नईच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आणि पाहता पाहता आमच्या हातून सामना खेचून घेतला. किंवा खरे सांगायचे झाल्यास त्यांनी आम्हाला संधीच दिली नाही. अशा सामन्यात चेन्नईने जितक्‍या कुशलतेने आमच्यावर दडपण वाढवीत नेले, तो अंतिम सामन्यात कसे खेळावे यासाठीचा आदर्शच ठरावा.

गोलंदाजांचे अपयश अनपेक्षित 
हैदराबादची फलंदाजीची बाजू गोलंदाजीच्या तुलनेत खूपच कमकुवत असल्याचे सर्वांनाच माहीत होते. परंतु त्याच वेळी आयपीएलच्या यंदाच्या संपूर्ण मोसमात हैदराबादने गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर पहिल्यांदा गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले व नंतर अंतिम फेरीतही धडक मारली. साखळी फेरीतच नव्हे तर क्‍वालिफायर-2 सामन्यातही हैदराबादच्या गोलंदाजांनी मोक्‍याच्या वेळी बळी घेत संघाला विजय मिळवून दिला होता. इतकेच नव्हे तर मधल्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाचे महत्त्वाचे फलंदाज बाद करण्यात हैदराबादने नेहमीच यश मिळविले. परंतु अंतिम सामन्यात बळींची नितांत गरज असताना हैदराबादचे हुकमी गोलंदाज अपयशी ठरले. विल्यमसननेही आपल्या गोलंदाजांच्या अपयशाची कबुली दिली. एकवेळपर्यंत आपले नियंत्रण असल्याचे आम्हाला वाटत होते. परंतु आमची ही समजूत किती चुकीची होती, हे वॉटसनने एका क्षणी आम्हाला दाखवून दिले. कदाचित आम्हाला त्या वेळी एक-दोन बळी घेता आले असते, तर फरक पडला असता. परंतु वॉटसनने एकही संधी न देता आमच्या हातून सामना काढून घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)