वैयक्तिक टीकेने शिरूरचे प्रश्‍न सुटणार का?

15 वर्षे काय केले, ते सांगा : डॉ. अमोल कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

रांजणगाव-माझ्यावर टीका केली जात आहे. हीन पातळीवरचे राजकारण केले जात आहे. पण माझा एक प्रश्‍न खासदार शिवाजीराव आढळराव यांना आहे. माझ्यावरील वैयक्तीक टीकेने पुणे – अहमदनगर महामार्गावरील जीवघेणी वाहतूक असो किंवा शिरूर मतदारसंघाचे जटील प्रश्‍न सुटणार आहेत का? याचे आधी उत्तर द्यावे, शिवाय मतदारसंघासाठी 15 वर्षे काय केले याचा लेखाजोखा जाहीरपणे मांडावा. अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडली.

डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्‍यातील आयोजित दौऱ्यात ते रांजणगाव येथील सभेत बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, मंगलदास बांदल, मानसिंग पाचुंदकर, जि.प. सदस्या स्वाती पाचुंदकर, शेखर पाचुंदकर, सविता बगाटे, केशरताई पवार, विश्‍वास कोहकडे, प्रकाश पवार, जयमाला जकाते, संगिता शेवाळे आदी उपस्थित होते. डॉ. कोल्हे म्हणाले, यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता कुणा-कुणाच्या सभा घ्यायच्या या पेचात ते सापडले आहेत. अगदी मोदींना येथे सभेला आणायचे असा प्रयत्न सुरु झाला आहे.

मोदींची एक सभाही मिळण्याची शक्‍यता धूसर असताना यांना मंत्रीपद दिसत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी स्वावलंबन आणि स्वाभिमान हा माझा मंत्र आहे. संपूर्ण आराखडा तयार आहे. भक्ती-शक्ती स्थळांना जोडून पर्यटनस्थळ म्हणून विकास करायचा आहे, टामाकेअर, यूथ गाईडन्स सेंटर असो किंवा आदिवासींनाही विकासाच्या प्रवाहात आणायचे आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे पाणीप्रश्‍न तर सुटला शिवाय रांजणगाव परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण केल्याने रोजगाराचाही प्रश्‍न मिटला हे सर्व राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमुळे झाले आहे. आता आमची बारा गावे आहेत, त्यांना शेतीसाठी चासकमान, डिंभा उजवा कालवा येथून पाणी मिळावे अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.

  • शिवसेनेला खिंडार!
    सोनेसांगवी परिसरात झालेल्या सभेत शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप दाते, रज्जाक शेख यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन डॉ. कोल्हे यांना मताधिक्‍य देण्याचा निर्धार केला. कट्टर शिवसैनिक रवि भुजबळ यांच्याकडून 51 हजार रुपयांचा निधीही सुपूर्द करण्यात आला. यावेळी सभेस सरपंच दत्तात्रय कदम, दत्ता डांगे, उपसरपंच मल्हारी काळे आदी उपस्थित होते. निमगाव भोगी येथे शेकडो शिवसैनिकांसमवेत विकास रासकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.